पिढीतील महान फलंदाज म्हणून ओळखला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा केला. सचिन तेंडुलकर या नावाला परिचयाची काहीच गरज नाही. फलंदाजीतील दिग्गज सचिन तेंडुलकर एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवून क्रिकेटमधून निवृत्त झाला. या दिग्गज क्रिकेटपटूने कारकिर्दीत अनेक विक्रम मोडीत काढले. आता सचिन मुंबई इंडियन्स संघासोबत मेंटॉर म्हणून कार्यरत आहे. त्याची पुढची पिढी म्हणजे अर्जुन तेंडुलकर याची क्रिकेटच्या मैदानातील सुरूवातीचा काळ सुरू आहे. मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सध्या दोघेही एकत्र आहेत. या दरम्यान, अर्जुनने आपल्या वडिलांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या.
IPL च्या १५ व्या हंगामा दरम्यान मुंबई इंडियन्स (MI) कॅम्पमध्ये सचिनने त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा केला. मुंबई पलटणने शेअर केलेल्या एका खास व्हिडिओमध्ये सचिनचा मुलगा आणि क्रिकेटर अर्जुन तेंडुलकर याने त्याच्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. “मी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. तुम्ही तुमचा आजचा खास दिवस एन्जॉय करा आणि तुम्ही माझ्यासाठी आयुष्यभर जे काही केले, त्यासाठी मनापासून धन्यवाद”, अशा शब्दात अर्जुनने सचिनला शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, आजच्या सामन्यासाठी अर्जुन तेंडुलकरला संघात स्थान देत सचिनला 'बेस्ट बर्थडे गिफ्ट' मिळणार का, असा प्रश्न होता. पण अर्जुनला अद्यापही संघात स्थान मिळालेले नाही. आजच्या सामन्यासाठी लखनौ विरूद्ध मुंबईचा संघ एकही बदल न करता उतरला. आता अर्जुनला संघात केव्हा स्थान मिळणार, हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे.