Ireland vs West Indies, First ODI: गेल्या काही वर्षात वेस्ट इंडिजचे खेळाडू विविध टी२० आणि इतर क्रिकेट लीग स्पर्धांमध्ये खेळताना दिसत आहेत. विविध स्पर्धांमध्ये ते आपला ठसा उमटवतानाही दिसत आहेत. पण संघ म्हणून त्यांना विजय मिळवणं कठीण जात असल्याचं चित्र गेल्या काही वर्षात दिसलं आहे. असं असतानाच २०२२ या वर्षाची सुरूवात विंडिजच्या संघाने दणदणीत विजयाने केली. या विजयातही मुख्य आकर्षक ठरलं ते 'पोलार्ड पॉवर' फलंदाजी. त्याने दणकेबाज खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
विंडिजने आयर्लंडच्या संघाचा पहिल्या वन डे सामन्यात २४ धावांनी पराभव केला. शनिवारी सबिना पार्कच्या मैदानावर २७० धावांचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात आयर्लंडचा संघ पूर्णबाद झाला. विंडिजच्या विजयात कर्णधार कायरन पोलार्डने आपली फटकेबाजी पुन्हा एकदा दाखवून दिली. त्याने ४ चौकार आणि ४ षटकार खेचत ६९ धावांची खेळी केली.
नाणेफेक गमावल्यानंतर विंडिजच्या डावाची सुरूवात खूप खराब झाली. ६२ धावांत त्यांनी ४ बळी गमावले. त्यानंतर पदार्पणाचा सामना खेळणारा शमराह ब्रूक्स आणि कर्णधार कायरन पोलार्ड यांनी पाचव्या विकेटसाठी तब्बल १५५ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. पदार्पणातच ब्रुक्सने ९३ धावांची धडाकेबाज खेळी केली. तर पोलार्डनेही फटेकबाज ६९ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यावर ४८.५ षटकात संघ २६९ धावांवर बाद झाला.
२७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगला. पण आयर्लंडचा संघ २४५ धावा करू शकला. आयरिश कर्णधार अँडी बलबर्नी याने ९४ चेंडूत ७१ धावांची खेळी केली. त्यात ७ चौकार आणि १ षटकार समाविष्ट होता. हॅरी हेक्टरनेही ५३ धावा केल्या. पण इतर फलंदाजांच्या हाराकिरीमुळे सामना आयर्लंडच्या हातून निसटला. त्यांच्या सहा फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही. अखेर शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्यांचा डाव संपुष्टात आला.