इंडियन प्रीमियर लीग २०२४ (IPL 2024) साठी सर्व फ्रँचायझींची तयारी झाली आहे. गुजरात टायटन्सचा यशस्वी कर्णधार हार्दिक पांड्या हा लीगपूर्वी खूप चर्चेत आला. कारण, त्याने गुजरातची साथ सोडून पुन्हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात येण्याचा निर्णय घेतला. MI नेही त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली. पण, या निर्णयानंतर रोहित शर्माचे चाहते प्रचंड संतापले आणि सोशल मीडियावर त्यांनी त्याचा रागही काढला. त्यानंतर जसप्रीत बुमराहने केलेल्या पोस्टचा संदर्भ या नाराजीशी जोडला गेला. त्यात आता किरॉन पोलार्डची भर पडली आहे.
मुंबई इंडियन्स संघाचे फलंदाजी प्रशिक्षक किरॉन पोलार्डने एक विचित्र इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे जी आता व्हायरल होत आहे. पोलार्डने एक फोटो पोस्ट केला आहे आणि ज्यामध्ये असे लिहिले आहे की पाऊस संपला की प्रत्येकाला छत्री एक ओझे वाटू लागते. त्याचप्रमाणे, जेव्हा प्रामाणिकपणा संपतो तेव्हा फायदे थांबतात.
या पोस्टनंतर आता चाहते त्याला रोहित शर्माशी जोडत आहेत, ज्याला हार्दिकमुळे कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते. अनेक चाहत्यांनी असेही म्हटले आहे की रोहितला स्वतःच्या कर्णधारपदाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे कारण त्याने मुंबईसाठी ५ आयपीएल विजेतेपदे जिंकली आहेत.
मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याच्या ट्रेडसाठी गुजरात टायटन्सला १५ कोटी नाही तर १०० कोटी रुपये दिले होते. हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सचे नशीब बदलले. हार्दिक पांड्या गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार झाला तेव्हा त्याने पहिल्याच सत्रात फ्रँचायझीला चॅम्पियन बनवले. यानंतर २०२३ साली त्याच्या नेतृत्वाखाली संघ फायनलमध्ये पोहोचला. हार्दिकने टायटन्ससाठी एकूण २१ सामने खेळले आणि यामध्ये ८३३ धावा केल्या व ११ विकेट घेतल्या.