रोहित नाईक
मुंबई : मुंबई इंडियन्सने शानदार विजय मिळवताना गतविजेत्या गुजरात टायटन्सचा २७ धावांनी धुव्वा उडवला. सूर्यकुमार यादवने झळकावलेले स्फोटक नाबाद शतक मुंबईच्या विजयात निर्णायक ठरले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत ५ बाद २१८ धावा केल्यानंतर गुजरातला २० षटकांत ८ बाद १९१ धावांवर रोखले.
लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची आठव्या षटकात ५ बाद ५५ धावा अशी अवस्था करून मुंबईने निकाल स्पष्ट केला. डेव्हिड मिलर आणि राशिद खान यांनी गुजरातकडून अपयशी झुंज दिली. आकाश मढवाल, पीयूष चावला व कुमार कार्तिकेय यांनी गुजरातच्या फलंदाजीला खिंडार पाडले. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या राशीदने आक्रमक अर्धशतक फटकावले. त्याने अल्झारी जोसेफसोबत नवव्या गड्यासाठी ४० चेंडूंत नाबाद ८८ धावांची भागीदारी केली. यामध्ये एकट्या राशीदने २८ चेंडूंत ७७ धावा कुटल्या. त्याआधी सूर्यकुमार यादवने स्फोटक नाबाद शतक झळकावले. कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी पॉवर प्लेमध्येच ६१ धावा झळकावल्या. यानंतर राशीदने ४ बळी घेतले.
IPL Points Table 2023: मुंबईच्या विजयचा ३ संघाना फटका; प्ले ऑफसाठी दोन संघ जवळपास निश्चित, समीकरण रंगलं!
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ५ बाद २१८ धावा (सूर्यकुमार यादव नाबाद १०३, ईशान किशन ३१, विष्णू विनोद ३०, रोहित शर्मा २९). गोलंदाजी : राशीद खान ४-०-३०-४, मोहित शर्मा ४-०-४३-१.
गुजरात टायटन्स : २० षटकांत ८ बाद १९१ धावा (राशीद खान नाबाद ७९, डेव्हिड मिलर ४१, विजय शंकर २९, राहुल तेवतिया १४). गोलंदाजी : आकाश मधवाल ४-०-३१-३, पीयूष चावला ४-०-३६-२, जेसन बेहरेनडॉर्फ ४-०-३७-१, कुमार कार्तिकेय ३-०-३७-२.
सूर्याने गुजरातची धुलाई करताना विष्णू विनोदसोबत चौथ्या गड्यासाठी ४२ चेंडूंत ६५ धावांची भागीदारी केली. त्याने कॅमरून ग्रीनसोबत सहाव्या गड्यासाठी १८ चेंडूंत नाबाद ५४ धावांची भागीदारी केली. यामध्ये ग्रीनचा वाटा केवळ ३ धावांचा होता.
आयपीएलमध्ये गुजरातविरुद्ध मुंबईने सर्वाधिक धावसंख्या नोंदवण्याचा पराक्रम करताना कोलकाताची ७ बाद २०७ धावांची कामगिरी मागे टाकली.
आयपीएलमध्ये २५० हून अधिक षटकार मारणारा रोहित शर्मा (२५२) हा ख्रिस गेल (३५७) आणि एबी डीव्हिलियर्स (२५१) यांच्यानंतरचा तिसरा फलंदाज ठरला.
सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये पहिल्यांदाच शतकी खेळी केली.
Web Title: Mumbai Indians beat the defending champions Gujarat Titans by 27 runs while winning brilliantly
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.