मुंबई- चेन्नई सुपर किंग्ज विरोधात झालेला आयपीएलचा पहिलाच सामना गमावल्यानंतर मुंबईला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दुसरा सामना सुरु होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळं आयपीएलमधून बाहेर पडला आहे. पॅट कमिन्स मुंबईचा सर्वात महत्वाचा गोलंदाज मानला जात होता. मुंबईने 2 कोटी बेस प्राईज असलेल्या पॅट कमिन्सला 5.6 कोटी रुपये किंमतीत खरेदी केलं होतं. माध्यमांच्या वृत्तानुसार पॅट कमिन्स आयपीएलच्या 11 व्या सत्रातून बाहेर पडला आहे. पॅट कमिन्सच्या कंबरेला दुखापत झाली आहे. सध्या पॅट कमिन्स डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्याला आराम करण्यास सांगितले आहे.
गेल्या वर्षभरात पॅट कमिन्सची कामगिरी उल्लेखनीय झाली आहे. दक्षिण आफ्रिकविरोधात झालेल्या कसोटी आणि टी-20 सामन्यात पॅट कमिन्सने टिच्चून मारा केला होता. गेल्या सत्रात पॅट कमिन्सने दिल्लीच्या संघाचे नेतृत्व केलं होतं. पॅट कमिन्स आतापर्यंत 18 टी-20 सामने खेळला असून त्याने 23 विकेट घेतल्या आहेत.
पॅट कमिन्सची कमी मुंबई संघाला नक्कीच जाणवेल. पहिल्या सामन्यात पाठीच्या दुखपतीमुळं तो खेळू शकला नव्हता. पण दुसऱ्या सामन्यात तो खेळेल असा संघ व्यवस्थापकाला विश्वास होता. मात्र, पॅट कमिन्सची दुखापत वाढल्यामुळं तो आयपीएलमधून बाहेर पडला आहे. पॅट कमिन्सच्या अनुपस्थीत जसप्रीत बुमरा, मुस्ताफिझूर रेहमान, बेन कटिंग, मिचेल मॅक्लेघन यांच्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा असेल.