IPL 2024: मुंबई इंडियन्स नवनिर्वाचित कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळण्यासाठी सज्ज आहे. आयपीएल २०२४ चा थरार २२ मार्चपासून रंगणार आहे. सलामीचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्ससोबत ट्रेड करून हार्दिकचा संघात समावेश केला. आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी मुंबईने हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केले. मुंबईने हार्दिकवर किती मेहरबानी केली याचा अंदाज यावरून लावता येईल की, मुंबईला आयपीएल चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्मालाही कर्णधारपदावरून हटवण्यात आले. दूरदृष्टी पाहून मुंबईच्या फ्रँचायझीने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई इंडियन्सने आता हार्दिक पांड्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हार्दिक म्हणतो की, मुंबई इंडियन्सची जर्सी परत एकदा परिधान करण्याची भावना माझ्यासाठी खूप खास आहे. मी माझ्या घरी परतलो आहे. हार्दिकने मुंबई इंडियन्समधूनच आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तो आयपीएल २०२१ पर्यंत ७ वर्ष मुंबईचा भाग राहिला. पण आयपीएल २०२२ पूर्वी मुंबईने त्याला रिलीज केले. त्यानंतर तो दोन वर्ष गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून आयपीएलचा भाग राहिला.
दिग्गज लसिंथ मलिंगाचे देखील गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मुंबई इंडियन्सच्या संघात पुनरागमन झाले आहे. "माली सुरुवातीपासूनच माझा भाऊ आहे आणि मार्क (फलंदाजी प्रशिक्षक) देखील खूप चांगला आहे. प्रत्येकाला अभिमान वाटेल असे क्रिकेट आम्ही खेळू, जे कोणीच विसरू शकणार नाही", असेही हार्दिकने सांगितले.
दरम्यान, इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ची तारीख जाहीर झाली आहे. यंदा आयपीएलनंतर लगेचच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे, शिवाय लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल नेमकी कुठे खेळवायची हाही प्रश्न होता. पण, याचे उत्तर मिळाले आहे. आयपीएल २०२४ ला २२ मार्चपासून सुरू होणार आहे आणि पहिल्या १७ दिवसांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखांनंतर पुढील वेळापत्रक जाहीर केले जाईल.
आयपीएलचे पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक
- २२ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
- २३ मार्च - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा. पासून, मोहाली
- २३ मार्च - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, रात्री ८ वा. पासून, कोलकाता
- २४ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. लखनौ सुपर जायंट्स, दुपारी ३.३० वा.पासून, जयपूर
- २४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
- २५ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
- २६ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
- २७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
- २८ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, रात्री ८ वा. पासून, जयपूर
- २९ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
- ३० मार्च - लखनौ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ
- ३१ मार्च - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वा. पासून, अहमदाबाद
- ३१ मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
- १ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई
- २ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखौ सुपर जायंट्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
- ३ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
- ४ एप्रिल - गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
- ५ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू,रात्री ८ वा. पासून, जयपूर
- ७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई
- ७ एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ