Rohit Sharma, Mumbai Indians । मुंबई : आयपीएल 2023 ची सुरूवात होण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी राहिला आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामातील सलामीचा सामना हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्स आणि महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. अशातच सर्व खेळाडू आपल्या संघाच्या कॅम्पमध्ये सामील होत आहेत. दरम्यान, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सने मागील वर्षीचे अपयश विसरून नव्याने तयारी सुरू केली आहे. पुन्हा एकदा विजेतेपद मिळविण्यासाठी पलटण सज्ज असल्याचे कर्णधार रोहित शर्माने म्हटले.
आयपीएलच्या दोन दिवस आधी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने त्याचा संघ आणि आयपीएलमधील सामन्यांबद्दल भाष्य केले आहे. याशिवाय रोहित शर्माने जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत अपडेटही दिले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ आगामी हंगामात आरसीबीविरुद्ध आपला सलामीचा सामना खेळेल. मुंबईचा पहिला सामना 2 एप्रिल रोजी बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर होणार आहे.
इम्पॅक्ट प्लेअर रूल हा चांगला नियम - रोहित रोहित शर्माने पत्रकार परिषद घेऊन आगामी हंगामाबद्दल आपली रणनिती स्पष्ट केली. माध्यमांशी संवाद साधताना रोहित शर्माला या हंगामातील काही सामन्यांमध्ये विश्रांती घेणार का असे विचारले असता रोहित शर्माने हसत-हसत म्हटले, "प्रशिक्षक याचे उत्तर देतील. संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर आहेत." मार्क बाउचर यांना जेव्हा हाच प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, "तुम्हाला रोहित शर्माला विश्रांती द्यायची आहे का? कर्णधार म्हणून रोहित शर्माने आपली सर्वोत्तम कामगिरी करावी अशी आमची इच्छा आहे." तसेच यावेळी इम्पॅक्ट प्लेअर रूल देखील आयपीएलमध्ये सामील होत आहे. हा एक चांगला नियम आहे, एक खेळाडू येईल आणि सामना झटपट बदलेल, असेही रोहित शर्माने सांगितले.
धोनी आणखी 2-3 वर्षे खेळेल - शर्माचेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत रोहितने म्हटले, "धोनी अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त दिसत आहे. तो आणखी दोन ते तीन वर्षे क्रिकेट खेळू शकेल असे दिसते. एमएस धोनीचे हे आयपीएलमधील शेवटचे वर्ष असेल असे मला वाटत नाही. धोनीची ही शेवटची आयपीएल असेल, असे गेल्या काही वर्षांपासून ऐकत आहे, पण त्याला तसे वाटत नाही." रोहितने त्याच्या संघाबद्दल म्हणजेच मुंबई इंडियन्सबद्दल सांगितले की, त्याला या संघाचे नेतृत्व करून दहा वर्षे झाली आहेत. हा एक अद्भुत प्रवास आहे. तसेच जसप्रीत बुमराहबद्दल अपडेट देताना, रोहित शर्माने स्पष्ट केले की, तो यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार नाही. एक-दोन दिवसात त्याची रिप्लेसमेंट जाहीर केली जाईल, बुमराहच्या अनुपस्थितीमुळे संघातील युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"