mi vs csk 2023 । मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2023) १६व्या हंगामात देखील मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आपल्या सलामीच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजयी सलामी देत मुंबई इंडियन्सला पराभवाची धूळ चारली. मुंबईचा या हंगामातील दुसरा सामना महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जसोबत (MI vs CSK) ८ एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. खरं तर ८ तारखेला या हंगामातील पहिलाच सामना मुंबईचा संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळत आहे, त्यामुळे रोहितसेना पुनरागमन करणार का हे पाहण्याजोगे असेल.
दरम्यान, चेन्नईविरूद्धच्या लढतीपूर्वी संघाचा कर्णधार रोहित शर्मा खास अंदाजात सराव करताना दिसला. याशिवाय हिटमॅनने युवा खेळाडू अर्जुन तेंडुलकरसह इतर सहकाऱ्यांना काही टिप्स देखील दिल्या. मुंबईच्या फ्रँचायझीने याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. आरसीबीविरूद्धच्या पराभवानंतर मुंबईचा संघ ८ तारखेला विजयाच्या इराद्याने मैदानात उतरेल.
मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, रोहित सर्व खेळाडूंना म्हणतो, "जी चर्चा आपण केली आहे त्याचा सराव करूया." यानंतर रोहितने फिरकी गोलंदाजीचा सराव केला. नंतर युवा खेळाडू अर्जुन तेंडुलकर आणि संघातील इतर सदस्यांसोबत चर्चा केली आणि त्यांना काही टिप्स दिल्या.
RCBची विजयी सलामीमुंबई इंडियन्सविरूद्धचा सामना जिंकून आरसीबीने विजयी सलामी दिली आहे. मुंबईला १७१ धावांवर रोखल्यानंतर विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस या जोडीने अप्रतिम कामगिरी करून विजय साकारला. विराटने ४६ चेंडूत नाबाद ८४ धावांची खेळी करून विजयावर शिक्कामोर्तब केला. तर कर्णधार डू प्लेसिस ४३ चेंडूत ७३ धावा करून कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीवर बाद झाला. अखेर आरसीबीने १६.२ षटकांत लक्ष्य गाठले आणि ८ गडी आणि २२ चेंडू राखून मोठा विजय मिळवला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"