Jasprit Bumrah on Mumbai Indians Captain, IPL 2022 : श्रीलंकेच्या संघाला पराभूत करत भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टी२० मालिका जिंकली. रोहितने मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिळवून दिलं. त्यामुळेच विराटने कर्णधार पदाचा राजीनामा दिल्यावर रोहितला संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली. रोहित सध्या कर्णधार म्हणून उत्तम कामगिरी करत आहे. पण याच दरम्यान, रोहित कर्णधार असलेल्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करावं असं तुला वाटत नाही का, असा सवाल फिरकीपटू अश्विनने जसप्रीत बुमराहला विचारला. त्याचं बुमराहने झकास उत्तर दिलं.
"मला कोणत्याही गोष्टींच्या मागे पळायला आवडत नाही. मला ती सवय लावून घ्यायची नाही. मला जी भूमिका दिली जाते ती भूमिका मी स्वत:च्या सक्षमतेनुसार पार पाडत असतो. खरं पाहता तुम्ही तुम्हाला येत असलेल्या गोष्टी दुसऱ्यांना शिकवून कायमच एकमेकांची मदत करत असता. मुंबई इंडियन्समध्ये अनेक सिनियर खेळाडू आहेत. आता मीदेखील त्यापैकीच एक आहे. त्यामुळे माझी कर्णधाराला गरज लागली तर मी त्याला नक्कीच मदत करतो. तुम्हाला इतरांना मार्गदर्शन करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही कर्णधारच असलं पाहिजे हे गरजेचं नाही", असं बुमराहने स्पष्ट केलं.
"मी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाबाबत असाच विचार करतो. मुंबईचा कर्णधार व्हायचंय अशी माझी कधीही अपेक्षा किंवा इच्छा नाहीये. माझ्या वैयक्तिक प्रगतीसाठी संघाचं कर्णधारपद भूषवणं मला आवडेल. तसंच एखाद्या परिस्थितीत माझ्यावर ती जबाबदारी टाकण्यात आली तर मी तो माझा सन्मानच असेल. माझ्यावर कर्णधारपदाची जबाबदारी दिली तर मी नक्की ते काम पार पाडेन. पण याचा अर्थ मी त्याच संधीची वाट पाहत राहीन असं मुळीच नाही", असंही त्याने स्पष्ट केलं.