ऑस्ट्रेलियात जंगलात लागलेल्या आगीने आतापर्यंत 23 जणांचा बळी घेतला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी शनिवारी 3 हजार रिजर्व्ह सैनिकांना बोलावून घेतले आहे. या आगीत जवळपास 50 कोटी प्राणी अन् पक्षांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये हजारो कोआला प्राण्यांचा समावेश आहे. युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या इकोलॉजिस्ट यांच्या संशोधनानुसार या आगीत 480 मिलियन्स म्हणजेच जवळपास 48 कोटी प्राणी अन् पक्षांचा जीव गेला आहे. दक्षिण गोलार्धातील सूर्याच्या प्रवेशाने ऑस्ट्रेलियातील जंगलात आगीच हंगाम सुरू झाला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा जीव गेलाय.
या आगीत संसार मोडलेल्या कुटुंबियांच्या मदतीसाठी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूनं मदतीचा हात पुढे केला आहे. या खेळाडूनं ट्वेंटी-20 क्रिकेटमधील प्रत्येक सिक्समागे या आगीत उध्वस्त झालेल्यांना 250 डॉलर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा हा पुढाकार पाहून अनेक क्रिकेटपटूही पुढे सरसावले आहेत आणि त्यांनीही प्रत्येक सिक्समागे 250 डॉलर मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्स ताफ्यात नव्यानं दाखल झालेल्या या खेळाडूनं या घोषणेनंतर पहिल्याच सामन्यात 750 डॉलर्सची मदत केली. आता हा खेळाडू कोण आणि त्याच्या साथीला आणखी कोण आलं ते जाणून घेऊया...
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस लीनला दोन कोटींच्या मूळ किंमतीत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. T10 स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावणारा ख्रिस लीन सध्या बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बन हिट संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यानं शुक्रवारी झालेल्या सामन्यात 55 चेंडूंत 11 चौकार व 3 षटकार खेचून नाबाद 88 धावांची खेळी केली. या सामन्यापूर्वी त्यानं प्रत्येक षटकाराला 250 डॉलर मदत करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यानं तीन षटकारानंतर ऑस्ट्रेलियातील आगीत संसार मोडलेल्यांच्या मदतीसाठी 750 डॉलर दिले. त्याच्या या सामाजिक पुढाकारात किंग्स इलेव्हन पंजाबच्या ग्लेन मॅक्सवेलनंही सहभाग घेतला.