Suryakumar Yadav come beck Mumbai Indians, IPL 2024: मुंबईच्या संघासाठी सध्या सुरु असलेली स्पर्धा फारच आव्हानात्मक होत चालली आहे. मुंबईच्या संघाने स्पर्धेच्या सुरुवातीलाच रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवले. गुजरात संघाला दोन वेळा फायनलमध्ये पोहोचवणाऱ्या हार्दिक पांड्याला संघात घेत मुंबईचा कर्णधार केले. त्यामुळे चाहत्यांचा मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनावर आणि हार्दिक पांड्यावर राग होताच. तो राग स्पर्धा सुरु झाल्यानंतरही स्पष्टपणे दिसून येत आहे. मुंबईच्या सामन्याआधी टॉससाठी हार्दिक पांड्या मैदानात आला की प्रेक्षकांकडून त्याला चिडवले जाते. तशातच मुंबईच्या संघाने पहिले तीनही सामने गमावले आहेत. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव संघात कधी परतणार, याकडे साऱ्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. त्याच्या दुखापतीबाबत मुंबई इंडियन्सच्या खेळाडूनेच अपडेट दिले आहे.
सूर्यकुमार यादव हा जगातील अव्वल क्रमांकाचा T20 फलंदाज आहे. पण दुखापतीमुळे यंदाच्या IPL मध्ये तो आतापर्यंत खेळताना दिसलेला नाही आणि मुंबईला त्याची उणीव भासत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सूर्यकुमारच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला सलग तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. या दरम्यान, सूर्यकुमार संघात कधी परतणार यावर पियुष चावलाने उत्तर दिले आहे.
राजस्थान विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव दिसण्याची शक्यता होती, पण तो संघात दिसला नाही. पियुष चावलाने सूर्यकुमारच्या फिटनेसबाबत अपडेट दिले आणि संघ NCAकडून अहवाल मिळण्याची वाट पाहत असल्याचे सांगितले. एनसीए अजूनही त्याच्या आरोग्यावर देखरेख ठेवत आहे आणि प्रशिक्षकांना याबद्दल कोणत्याही खेळाडूपेक्षा जास्त माहिती आहे. त्यामुळे NCAकडून अपडेट आले की त्याच्या पुनरागमनाबद्दल समजू शकेल असे चावला म्हणाला.