IPL 2022: मध्ये आज (शनिवारी) डबल हेडर सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिला सामना गुजरात टायटन्स (GT) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात दुपारी होईल. तर दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (RR) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) हे संघ एकमेकांशी भिडणार आहेत. राजस्थान आणि मुंबई यांच्यातील सामना हा ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू दिवंगत शेन वॉर्नला श्रद्धांजली ठरेल. मुंबई फ्रँचायझीने शेन वॉर्नचा फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. राजस्थान फ्रँचायझीनेही हे रिट्विट केले आहे.
२००८ पासून आयपीएल टूर्नामेंटला सुरुवात झाली. त्यात शेन वॉर्नने राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करण्यास सुरूवात केली. पहिल्या सत्रात राजस्थानचा संघ अंडरडॉग मानला जात होता, पण वॉर्ननेच या संघाला चॅम्पियन बनवले. आयपीएलच्या इतिहासात राजस्थानने आतापर्यंत फक्त एकच विजेतेपद पटकावले आहे. हा संघ अद्यापही दुसऱ्या विजेतेपदाच्या शोधात आहे. सध्या राजस्थान गुणतालिकेत अव्वल आहे. याचेच औचित्य साधून त्यांना पहिले विजेतेपद मिळवून देणाऱ्या शेन वॉर्नला श्रद्धांजली देण्याचा निर्णय मुंबईच्या संघाने घेतला. तसे ट्वीट करत त्यांनी याची घोषणा केली.
ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याचे ४ मार्च रोजी थायलंडमधील कोह सामुई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्नला ३० मार्च रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. या मैदानावर त्याने आपली ७०० वी कसोटी विकेट घेतली होती. ही कामगिरी करणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला होता. शेन वॉर्नने २००७ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि त्या वेळच्या विश्वविक्रमी ७०८ विकेट्स घेतल्या. त्यानंतर २००८ पासून त्याने IPL मध्येही आपली छाप सोडली. पण काही वर्षांत त्याने सर्व क्रिकेटच्या प्रकारांतून निवृत्त होत कोचिंग आणि समालोचनाचे क्षेत्र निवडले.