गुजरात टायटन्सने दणदणीत विजय मिळवताना मुंबई इंडियन्सला ५५ धावांनी सहज नमवले. एकतर्फी झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळालेल्या गुजरातने २० षटकांत ६ बाद २०७ धावा उभारल्या. यानंतर मुंबईला २० षटकांत ९ बाद १५२ धावांवर रोखत गुजरातने शानदार विजय मिळवला. गुजरातच्या या विजयासह मुंबई इंडियन्सच्याअर्जुन तेंडुलकरने लगावलेल्या षटकाराची चर्चा रंगली आहे.
अर्जुनने गोलंदाजी करताना २ षटकात ९ धावा देऊन ऋद्धिमान साहाला बाद केले, तर फलंदाजी करताना त्याने ९ चेंडूत १३ धावा केल्या. अर्जुनने १३ धावांच्या खेळीत १ षटकारही लगावला. अर्जुनने मोहित शर्माच्या चेंडूवर पुल शॉट मारून शानदार षटकार ठोकला. मुंबईच्या डावाच्या २०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोहितने अर्जुनला बाउन्सर टाकला, ज्यावर अर्जुनने पुल शॉट मारला आणि चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या षटकारासाठी गेला. अर्जुनचा हा आयपीएलमधील पहिला षटकार होता. दुसरीकडे सोशल मीडियावर चाहत्यांनी अर्जुनबद्दल चर्चा सुरू झाली. अर्जुनने ज्या पद्धतीने षटकार मारला आहे, ते पाहता येत्या सामन्यांमध्ये अर्जुनला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळेल, अशी आशा चाहत्यांना लागली आहे.
मुंबईकरांची सुरुवात अडखळती झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन यांना दडपणाचा सामना करण्यात अपयश आले. कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव आणि नेहाल वधेरा यांनी मुंबईला सावरण्याचा अपयशी प्रयत्न केला. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईकरांच्या देहबोलीत आत्मविश्वासाचा अभाव दिसला. नूर अहमद आणि राशिद खान या अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी मुंबईकरांची 'फिरकी' घेतली. द्विशतकी धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईकरांनी तब्बल ५१ चेंडू निर्धाव खेळत पराभव ओढावून घेतला.
तत्पूर्वी, मुंबईकरांनी पुन्हा एकदा डेथ ओव्हर्समध्ये सुमार गोलंदाजी केली. अखेरच्या सहा षटकांमध्ये ९४ धावा कुटताना गुजरातने द्विशतकी मजल मारली. शानदार अर्धशतक झळकावलेल्या शुभमन गिलला, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर आणि राहुल तेवटिया यांच्या फटकेबाजीची चांगली साथ लाभली. अर्धशतक झळकावल्यानंतर गिल १२ व्या षटकात बाद झाला. मुंबईकर वर्चस्व गाजविणार असे दिसत असताना अभिनवने अनपेक्षित हल्ला चढवत डेव्हिड मिलरसोबत पाचव्या गड्यासाठी ३५ चेंडूंत ७१ धावांची वेगवान भागीदारी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Mumbai Indians Defeat, But Arjun Talk Continues; Mohit Sharma hits a six in the dugout
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.