मुंबई : विजयाची हॅट्ट्रिक साधणाऱ्या मुंबई इंडियन्सची गाठ शनिवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध पडेल. यानिमित्ताने सलग चौथा विजय साजरा करण्यास मुंबईकर सज्ज असून नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्यासह किएरॉन पोलार्ड तसेच अल्जारी जोसेफ यांच्या कामगिरीकडे चाहत्यांच्या नजरा असतील.
पायाच्या दुखापतीमुळे रोहित मागच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत पोलार्डने किंग्स पंजाबविरुद्ध तुफानी ८३ धावा ठोकून मुंबईला तीन गड्यांनी विजय मिळवून दिला. २२ वर्षांच्या जोसेफने विजयी फटका (नाबाद १५ धावा) मारला होता. मुंबई सहा सामन्यात चार विजयासह तिसºया, तर राजस्थान सहा सामन्यात एका विजयासह सातव्या स्थानी आहे.
या सामन्यात रोहित खेळणार असल्याने त्याच्या फिटनेसबद्दल चिंता संपली असून संघाचे मनोबल उंचावले आहे. याशिवाय ईशान किशन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि सूर्यकुमार यादव हे भरवशाचे फलंदाज संघात आहेत. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी जसप्रीत बुमराहसोबत आॅस्ट्रेलियाचा जेसन बेहरेनडोर्फ आणि जोसेफ आहेच. चेन्नईविरुद्ध तीन षटकात ५३ धावा मोजणाºया राजस्थानच्या गोलंदाजांना मुंबईच्या फलंदाजांपुढे सावध रहावे लागेल.चेन्नईविरुद्ध बेन स्टोक्सच्या सर्वाधिक २८ धावा वगळता राजस्थानचे अन्य फलंदाज अपयशी ठरले. कर्णधार अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन, स्टीव्ह स्मिथ व जोस बटलर हे क्षमतेनुरुप फटकेबाजी करताना दिसत नाहीत. गोलंदाजीत जयदेव उनाडकट, धवल कुलकर्णी, श्रेयस गोपाल यांना चमक दाखविण्याचे आव्हान असून स्टोक्सकडून अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा आहे. (वृत्तसंस्था)२१ हजार शालेय विद्यार्थी राहणार उपस्थित...शालेय शिक्षण आणि क्रीडासाठी योगदान देण्यवर मुंबई इंडियन्सने कायमच भर दिला आहे. ‘एज्युकेशन अॅण्ड स्पोटर््स फॉर आॅल’ या उपक्रमांतर्गत विविध स्वयंसेवी संस्थासह काम करताना मुंबई इंडियन्सने सामाजिक भान राखले आहे.यामुळेच शालेय विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या स्टार्सचा खेळ प्रत्यक्षात पाहता यावा यासाठी मुंबई इंडियन्स संघाकडून दरवर्षी वानखेडे स्टेडियमवरील दुपारी होणारा सामना केवळ या विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवला जातो. शनिवारी मुंबई-राजस्थान सामन्यासाठी २१ हजार शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने वानखेडे स्टेडियम गजबजून जाणार आहे.