Join us  

रोहित शर्माचा संघातील रोल काय? चाहत्यांचा राग समजू शकतो, पण...! माहेला जयवर्धनेचं मोठं विधान

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चे मिनी ऑक्शन आज दुबईत पार पडले. मुंबई इंडियन्सने त्यांच्या रणनीतीनुसार चांगले खेळाडू निवडले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 11:03 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चे मिनी ऑक्शन आज दुबईत पार पडले. मुंबई इंडियन्सने त्यांच्या रणनीतीनुसार चांगले खेळाडू निवडले आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२४ मध्ये खेळणार आहे. रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेण्याचा MI चा निर्णय चाहत्यांना पटलेला नाही आणि फ्रँचायझीला त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. IPL 2024 ऑक्शनच्या वेळी मुंबई इंडियन्सचे ग्लोबल हेड ऑफ क्रिकेट माहेला जयवर्धनेने मोठं विधान केलं.  

हार्दिक पांड्या आमच्या ड्रेसिंग रुममध्ये बराच काळ होता आणि त्यामुळे त्याचे येणे काही नवीन नाही. अष्टपैलू खेळाडू म्हणून तो काय करू शकतो, हे आम्हाला माहीत आहे. गुजरात टायटन्सचे नेतृत्व करण्याचा त्याचा अनुभव काहीसा वेगळा असेल, त्याच अनुभवावर संघबांधणी करण्याची संधी आहे, असे जयवर्धने म्हणाला.  

त्याने पुढे म्हटले की, “ रोहित शर्माला हटवण्याचा निर्णय कठीण होता, परंतु तो आम्हाला घ्यावा लागला. हे भावनिक आहे. पण मुंबईचा भाग असलेल्या प्रत्येकाला माहित आहे की खेळाडूने योगदान दिलेले प्रत्येक क्षण आम्ही जपतो. वारसा ही अशी गोष्ट आहे जी आम्हाला पुढे न्यायची आहे आणि आम्ही त्या विजयांसाठी, त्या ट्रॉफींसाठी लढत राहू इच्छितो. आमच्याकडे ते करण्यासाठी कौशल्य आहे. अनेकांना हा निर्णय खूप लवकर घेतला असे वाटू शकते, परंतु हा निर्णय आम्हाला कधीतरी घ्यावा लागणार होताच.'' 

चाहत्यांचा संताप रास्त आहे. माझ्यामते प्रत्येकजण भावनिक झाला होता आणि आम्हाला त्याचा आदर आहे. पण, त्याचवेळी फ्रँचायझीला असे निर्णय घ्यावे लागतात, हेही जयवर्धने याने स्पष्ट केले. तो पुढे म्हणाला, "पुढील पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी संघात रोहित शर्मा मैदानावर आणि मैदानाबाहेर असणे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तो अतिशय हुशार आहे. मी रोहितसोबत खूप जवळून काम केले आहे. तो एक उत्कृष्ट व्यक्ती आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरसोबतही असे घडले आहे, जो तरुणांसोबत खेळला होता. त्याने नेतृत्व दुसऱ्या कोणाला तरी दिले आणि मुंबई इंडियन्स योग्य दिशेने जात असल्याचे सुनिश्चित केले.”

टॅग्स :मुंबई इंडियन्सआयपीएल लिलावआयपीएल २०२३रोहित शर्माहार्दिक पांड्या