आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. इम्पॅक्ट प्लेअरच्या नवीन नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंना चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे. न्यूझीलंडविरूद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात ११ गडी बाद करून शानदार कामगिरी करणारा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर याला आगामी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आपल्या ताफ्यात घेण्यासाठी तीन संघ उत्सुक आहेत. त्यामुळे रियाद येथे २५ आणि २६ नोव्हेंबरला होणाऱ्या आयपीएल लिलावात वॉशिंग्टन सुंदरचा भाव वधारणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई, गुजरात आणि चेन्नई हे तीन आयपीएल संघ वॉशिंग्टन सुंदर याला आपल्या संघात घेण्यास उत्सुक आहेत. सुंदर हैदराबादच्या रिटेंशन यादीत नाही. पण, तरीही हैदराबाद संघ आरटीएम अधिकाराचा वापर करून सुंदरला कायम ठेवू शकतो. भारताकडून तिन्ही प्रारुपात खेळणारा सुंदर आयपीएल लिलावात सर्वांचेच लक्ष वेधून घेणार आहे. हैदराबादने सुंदरला २०२४ आयपीएलमध्ये केवळ दोन सामन्यात संधी दिली होती.
गिल, राशीद, सुदर्शन गुजरात संघात कायम? गुजरात संघ आयपीएलच्या लिलावात कर्णधार शुभमन गिल, राशिद खान आणि डावखुरा फलंदाज साई सुदर्शन यांना संघात कायम ठेवू शकतो. आक्रमक फलंदाज राहुल तेवतिया आणि शाहरूख खान यांनाही संघात कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. गिलच्या नेतृत्त्वात गुजरातचा संघ मागील आयपीएल सत्रात आठव्या स्थानावर राहिला होता.