mumbai indians team 2023 । मुंबई : मुंबई इंडियन्सला नेहमीप्रमाणे यंदा देखील आयपीएलच्या (IPL 2023) आपल्या सलामीच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. मागील अनेक वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. मुंबई इंडियन्सचा संघ पहिला सामना देवाला देतो अशा भन्नाट प्रतिक्रिया देखील समोर येत असतात. काल झालेल्या सामन्यात रॉयस चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने (MI vs RCB) मुंबई इंडियन्सला पराभवाची धूळ चारली. विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी अप्रतिम खेळ दाखवत सामना आपल्या नावावर केला. अशातच पहिल्या पराभवानंतर मुंबईवर टीका होत असताना संघाच्या माजी खेळाडूने टीकाकारांची शाळा घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने निर्धारित २० षटकांत ७ बाद १७१ धावा केल्या. आरसीबीच्या गोलंदाजांसमोर कोणत्याच मुंबईच्या फलंदाजाचा टिकाव लागत नव्हता. अशा स्थितीत तिलक वर्माने मुंबईची लाज वाजवली अन् ४६ चेंडूत नाबाद ८४ धावा कुटल्या. वर्माच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने आरसीबीसमोर १७२ धावांचे सन्मानजनक लक्ष्य ठेवले. मात्र, विराट-डू प्लेसिसच्या जोडीने १७२ धावांचे आव्हान सहज गाठले आणि विजयी सलामी दिली.
मिचेल मॅक्लेनघनने घेतली टीकाकारांची शाळा
मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर त्यांच्यावर टीका केली जात आहे. अशातच न्यूझीलंडचा स्टार आणि मुंबईचा माजी खेळाडू मिचेल मॅक्लेनघन संघाच्या मदतीला धावून आला. त्याने टीकाकारांना प्रत्युत्तर देताना म्हटले, मुंबईचा संघ पहिला सामना हरल्यानंतर चॅम्पियन होतो. मिचेल मॅक्लेनघनने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पहिला सामना गमावल्याशिवाय एकदाही आयपीएलचा किताब जिंकलेला नाही." एकूणच मिचेल मॅक्लेनघनने आपल्या संघाची पाठराखण करत टीकाकारांची शाळा घेतली आहे.
RCBची विजयी सलामी
मुंबई इंडियन्सविरूद्धचा सामना जिंकून आरसीबीने विजयी सलामी दिली आहे. मुंबईला १७१ धावांवर रोखल्यानंतर विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस या जोडीने अप्रतिम कामगिरी करून विजय साकारला. विराटने ४६ चेंडूत नाबाद ८४ धावांची खेळी करून विजयावर शिक्कामोर्तब केला. तर कर्णधार डू प्लेसिस ४३ चेंडूत ७३ धावा करून कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीवर बाद झाला. अखेर आरसीबीने १६.२ षटकांत लक्ष्य गाठले आणि ८ गडी आणि २२ चेंडू राखून मोठा विजय मिळवला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: mumbai indians have never won a championship after winning the first game, says Mitchell McClenaghan after mi loss against rcb in ipl 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.