hayley matthews wpl, Mumbai Indians । मुंबई : महिला प्रीमिअर लीगच्या (WPL 2023) पहिल्या हंगामाचे जेतेपद मुंबई इंडिन्सच्या संघाने पटकावले आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील मुंबईने अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून ट्रॉफीवर आपल्या संघाचे नाव कोरले. वेस्ट इंडिजची स्फोटक खेळाडू हिली मॅथ्यूज हिचा मुंबईच्या विजयात मोठा वाटा राहिला आहे. त्याचबरोबर गोलंदाजीतही तिने सर्वाधिक बळी घेतले असून पर्पल कॅपची मानकरी ठरली आहे. एकेकाळी भालाफेक करणाऱ्या या खेळाडूने केवळ पर्पल कॅपच जिंकली नाही तर तिला प्लेयर ऑफ द सीरिज म्हणूनही गौरविण्यात आले.
40 लाख रूपयांत मुंबईच्या ताफ्यात सामीलहिली मॅथ्यूजबद्दल भाष्य करायचे झाले तर, तिने मुंबई इंडियन्सच्या संघात लेडी पोलार्डची भूमिका पार पाडली आहे. मुंबईच्या पुरूष संघात वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने प्रभावी कामगिरी केली होती. आता तो मुंबईच्या संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याच्याच देशातील हिलीने मुंबईच्या महिला संघाला अष्टपैलू खेळी करून बळ दिले. वयाच्या 16 व्या वर्षी वेस्ट इंडिज महिला संघात पदार्पण केल्यानंतर हिलीने मागे वळून पाहिले नाही आणि पुढे जात राहिली. भारतात खेळल्या गेलेल्या महिला प्रीमिअर लीगमपूर्वी हिली फारशी चर्चेत नव्हती. म्हणूनच लिलावाच्या पहिल्या फेरीत कोणत्याही फ्रँचायझीने तिच्यावर बोली लावली नाही. पण दुसऱ्या फेरीत मुंबईने हिलीचा 40 लाख रुपयांच्या मूळ किमतीत आपल्या ताफ्यात समावेश केला आणि ती या स्पर्धेतील सर्वात प्रभावशाली खेळाडू ठरली.
अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी हिली मॅथ्यूजने मुंबईसाठी एकूण 10 सामने खेळले आणि या स्पर्धेत सर्वाधिक 16 बळी घेत 271 धावा केल्या. हिलीने आपल्या शानदार गोलंदाजीने भारतीय खेळपट्ट्यांवर कहर केला आणि मुंबईला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अंतिम सामन्यात हिलीने चार षटकांच्या स्पेलमध्ये दोन मेडन षटक टाकले तर पाच धावांत तीन बळी घेतले. त्यामुळे दिल्लीचा संघ 20 षटकांत केवळ 131 धावा करू शकला. यामुळेच महिला प्रीमिअर लीगच्या पहिल्या हंगामात सर्वाधिक 16 बळी घेतल्याबद्दल हिलीला पर्पल कॅप देण्यात आली. त्याचबरोबर मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचीही निवड झाली आहे. यासह हिलीने 271 धावा करत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पाचवे स्थान पटकावले. 345 धावांसह ऑरेंज कॅप दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेंग लॅनिंगच्या नावावर आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"