मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने बुधवारी एक भावनिक पोस्ट केली. इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात Mumbai Indians ची वाटचाल खडतर मार्गातून सुरू आहे. पाच वेळा आयपीएल जेतेपद उंचावणाऱ्या मुंबईला सलग तीन लढतीत हार मानावी लागली आहे आणि त्यामुळे रोहित शर्मा प्रचंड नाराज झालेला दिसला. बुधवारी पुण्यातील लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने ५ विकेट्स राखून मुंबईला पराभूत केले. पॅट कमिन्सने एकट्याने १५ चेंडूंत ५६ धावा कुटून मुंबईच्या तोंडचा घास पळवला. या पराभवानंतर रोहितने केलेली पोस्ट व्हायरल झाली आहे.
कोलकाताला विजयासाठी ३० चेंडूंत ३५ धावा करायच्या होत्या आणि कमिन्सने ६ चेंडूंत ३५ धावा कुटून मुंबईचा पराभव निश्चित केला. त्यामुळे रोहित प्रचंड वैतागला, परंतु त्यानंतर त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्याने म्हटले की, आम्ही चांगल्या-वाईट परिस्थितीचा मिळून सामना करतो, एकसंघ राहतो आणि ही आमची ताकद आहे. तुम्ही अजून काहीच पाहिलेलं नाही.
या पोस्टमधून रोहितने मुंबई इंडियन्स पुढील सामन्यात नव्या ऊर्जेने मैदानावर उतरणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. मुंबईला दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता यांच्याकडून पराभव पत्करावा लागला आहे. दिल्लीने ४ विकेट्स राखून, राजस्थानने २३ धावांनी, तर कोलकाताने ५ विकेट्स राखून हे विजय मिळवले. मागील पर्वात मुंबई इंडियन्सला प्ले ऑफमध्येही प्रवेश करता आलेला नाही आणि त्या धक्क्यातून संघ अद्याप सावरलेला दिसत नाहीय.