Pollard Mumbai Indians Avesh Khan, IPL 2022 MI vs LSG: मुंबई इंडियन्सच्या संघाला IPL च्या यंदाच्या हंगामात सलग सहाव्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. लखनौ सुपर जायंट्स संघाने हरवल्यानंतर मुंबईने पराभवाचा लाजिरवाणा षटकार लगावला. लखनौने कर्णधार लोकेश राहुलच्या शतकाच्या जोरावर मुंबईला २०० धावांचे आव्हान दिले होते. पण मुंबईला मात्र ९ बाद १८१ पर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे मुंबईचा सलग सहावा पराभवा झाला.
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या लखनौचा सलामीवीर क्विंटन डी कॉक १३ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारासह २४ धावा काढून बाद झाला. मनिष पांडेने धावगती वाढवली, पण तो २९ चेंडूत ६ चौकारांसह ३८ धावा काढून माघारी परतला. मोठे फटके खेळणारे मार्कस स्टॉयनीस (१०) आणि दीपक हुडा (१५) दोघेही झटपट बाद झाले. पण कर्णधार लोकेश राहुलने तुफानी खेळी केली. त्याने ६० चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद १०३ धावा केल्या. १००व्या IPL सामन्यात शतक ठोकणारा राहुल पहिला फलंदाज ठरला.
२०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या डावाची सुरूवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा ६ तर इशान किशन १३ धावांवर बाद झाला. Baby AB डेवाल्ड ब्रेविसने झंझावाती फटके खेळायला सुरूवात केली होती, पण १३ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकार खेचल्यानंतर तो ३१ धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी चांगली झुंज दिली. सूर्याने २७ चेंडूत ३ चौकारांसह ३७ धावा केल्या. तर तिलक वर्माने २ चौकारांसह २६ धावा केल्या. किरॉन पोलार्ड कडून संघाला अपेक्षा होत्या. पण त्याने अतिशय विचित्र खेळ करत संघाला अधिक बुचकळ्यात टाकले. तो १४ चेंडूत २५ धावा काढून बाद झाला आणि मुंबईला १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.