मुंबई : मुंबई इंडियन्सने कर्णधारपदी हार्दिक पांड्याची वर्णी लावली अन् क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली. मुंबईचा मावळता कर्णधार रोहित शर्मा कर्णधारपदावरून पायउतार झाल्याने चाहते रोष व्यक्त करत आहेत. हार्दिककडे नेतृत्व सोपवत असल्याची घोषणा मुंबईच्या फ्रँचायझीने केली. हार्दिक पांड्याला कर्णधार बनवताच मुंबईच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला. मुंबईचे सोशल मीडियावरील फॉलोअर्स झपाट्याने कमी झाले असून एका दिवसांत तब्बल १.५ लाख चाहत्यांनी मुंबई इंडियन्सला सोशल मीडियावर अनफॉलो केले.
शुक्रवारी मुंबई इंडियन्सचे ग्लोबल हेड ऑफ फरफॉर्मन्स प्रमुख माहेला जयवर्धने म्हणाला, ''मुंबई इंडियन्ससाठी भविष्याच्या तयारीच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. सचिन तेंडुलकर ते हरभजन सिंग आणि रिकी पाँटिंग ते रेहित शर्मा यासारख्या दिग्गजांचे मुंबई इंडियन्सला नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने यशाची शिखरं पादाक्रांत केली आहेत. आता भविष्याचा विचार करताना निर्णय घ्यावे लागत आहेत. त्यामुळे हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली गेली आहे."
रोहित शर्माचं काय?२०२२च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उपांत्य फेरीपासून रोहित शर्मा ट्वेंटी-२० क्रिकेट खेळलेला नाही. आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही तो भारतीय संघाकडून खेळेल याची शक्यता कमी आहे. अशातच मुंबई इंडियन्सनेही भविष्याचा विचार करून हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून निवड केली आहे. रोहित ३६ वर्षांचा आहे आणि त्याच्या देखरेखीखाली हार्दिककडून संघ तयार व्हावा अशी फ्रँचायझीची इच्छा आहे.
पांड्याचा प्रवासहार्दिक पांड्याने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने १२३ आयपीएल सामन्यांत २३०९ धावा केल्या आहेत आणि ५३ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २०२४ च्या लिलावासाठी मुंबई इंडियन्सकडे १५.२५ कोटीच रक्कम शिल्लक होती आणि गुजरात हार्दिकला १५ कोटी देत होते. त्यामुळे मुंबईला हार्दिकला संघात घेण्यासाठी पैसे कमी पडले होते. त्यांनी १७.५ कोटींत खरेदी केलेल्या कॅमेरून ग्रीनला RCB सोबत ट्रेड करून पर्समधील रक्कम वाढवली अन् हार्दिकला मोठी रक्कम देऊन आपल्या ताफ्यात घेतले. हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सला आपल्या पदार्पणाच्या हंगामात किताब जिंकण्यात यश आले.