India vs West Indies 1st T20 : टीम इंडियाने पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा सहा गडी राखून पराभव केला. भारताच्या विजयात Suryakumar Yadav ने महत्त्वाची भूमिका बजावली. सूर्यकुमारने मोक्याच्या क्षणी दमदार फलंदाजी करत नाबाद ३४ धावा केल्या. सूर्याने व्यंकटेश अय्यरसोबत ४८ धावांची नाबाद भागीदारी केली. पण त्यानंतर सूर्यकुमार यादव वेस्ट इंडिजचा कर्णधार Kieron Pollard च्या खांद्यावर विसावल्याचं जे चित्र दिसलं त्याने मुंबई इंडियन्सचा चाहता वर्ग सुखावला.
सामना संपल्यानंतर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला. या फोटोत सूर्यकुमार यादव कॅरेबियन कर्णधार पोलार्डच्या खांद्यावर डोकं ठेवून विश्रांती घेताना दिसला. पोलार्ड अंपायरशी संवाद साधत असताना सूर्या शांतपणे आला आणि त्याच्या खांद्यावर विसावला. मुंबई इंडियन्स हे एक कुटुंब (One Family) असल्याचं नेहमी बोललं जातं. सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्ड IPL मध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करतात. मुंबईच्या संघाने IPL 2022 साठी पोलार्ड, सूर्यकुमारसह चार रिटेन केलं आहे. त्यामुळे सामन्यानंतर या दोन मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंमधील बंधुत्व दिसून आले.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या संघाने सात गडी गमावून १५७ धावा केल्या. वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरनने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. भारताकडून पदार्पण करणाऱ्या रवी बिश्नोई आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरात भारताने १८.५ षटकांत ४ बाद १६२ धावा करून सामना जिंकला. रोहितने १९ चेंडूत ४० धावा केल्या. इशान किशन ३५ धावाच करू शकला. शेवटच्या टप्प्यात सूर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यर यांनी शानदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. सूर्यकुमार ३४ आणि व्यंकटेश अय्यर २४ धावांवर नाबाद राहिले.