Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2022 Mega Auction: भारतातील सर्वात लोकप्रिय टी२० स्पर्धा असलेल्या IPL चा यंदाचा हंगाम मार्च २०२२ च्या अखेरीस सुरू होणार असून ही स्पर्धा मे महिन्याच्या अखेरपर्यंत चालणार असल्याची माहिती नुकतीच BCCI चे सचिव जय शाह यांनी दिली. या हंगामासाठी दोन नवे संघ स्पर्धेत दाखल होणार आहेत. त्यामुळे जुन्या ८ संघांनी आपल्यातील तीन ते चार खेळाडू कायम ठेवून बाकी सर्व खेळाडूंना करारमुक्त केलं. आता त्या सर्व खेळाडूंवर मेगा लिलावात बोली लावली जाणार आहे. मुंबई इंडियन्सने आपला कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड आणि सूर्यकुमार यादव यांना संघात कायम ठेवलं. त्यामुळे आता रोहितसोबत सलामीला कोण याबाबत मुंबईचा संघ नक्कीच विचार करत असून त्यांच्याकडे तीन पर्याय असल्याची चर्चा आहे. पाहूयात ते ३ पर्याय...
देवदत्त पडीकल-मुंबई इंडियन्सने जर पारंपारिक पद्धतीने विचार करत डाव्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजीच्या कॉम्बिनेशनवर भर दिला. अशा परिस्थितीत मुंबई फलंदाज देवदत्त पडिकल याला करारबद्ध करू शकते. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने मेगा लिलावापूर्वी त्याला करारमुक्त केलं होतं. पडिकलने IPL 2021 मध्ये त्याचं पहिलं शतक झळकावलं होतं. RCBकडून खेळताना तो संघातील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक होता. मेगा लिलावात पडिकलची मूळ किंमत सर्वोच्च ब्रॅकेटमध्ये म्हणजे २ कोटी इतकी आहे. त्यापुढे त्याच्यावर बोली लावली जाईल.
जॉनी बेअरस्टो- सनरायझर्स हैदराबाद (SRH) चा माजी सलामीवीर जॉनी बेअरस्टो याच्याकडे IPL मध्ये धावा करण्याचा चांगला अनुभव आहे. बेअरस्टोने २०१९ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध ईडन गार्डन्स येथे आयपीएल पदार्पण केलं होतं. बेअरस्टोने IPL मध्ये २८ सामन्यांत १ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. इंग्लंडसाठी अत्यंत वाईट ठरलेल्या आणि नुकत्याच पार पडलेल्या अँशेस मालिकेत इंग्लंडकडून एकमेव शतक झळकावणारा फलंदाज बेअरस्टोच होता. त्यामुळे यष्टीरक्षक-फलंदाज असं चांगलं कॉम्बिनेशन असलेल्या बेअरस्टोवर चांगली बोली लागण्याची शक्यता आहे. मेगा लिलावात बेअरस्टोसाठी मूळ किंमत दीड कोटी रुपये आहे.
शिखर धवन- IPL मधील सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करणारा फलंदाज म्हणजे शिखर धवन. दिल्ली कॅपिटल्सने त्याला करारमुक्त केलं आहे. भारतासाठी शिखर धवन-रोहित शर्मा ही जोडी बरेच वर्षांपासून खेळते आहे. या प्रस्थापित जोडीला मुंबई संघाकडून खेळवण्यासाठी मुंबईचा संघ नक्कीच आतुर असेल. आयपीएलच्या सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १९२ सामन्यांमध्ये ५ हजार ७८४ धावा केल्या आहेत. मेगा लिलावासाठी शिखर धवनची मूळ किंमत २ कोटी इतकी आहे. त्यामुळे धवनवर बंगळुरूमधील लिलावात जोरदार बोली लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या तीन पर्यायांपैकी मुंबईचा संघ कोणाला पसंती देतो की एखादा नवीन पर्याय शोधतो, याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे.