Indian Premier League 2024 मध्ये मुंबई इंडियन्सला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्याचं आणखी एक आयपीएल पर्व निराशाजनक राहिले. आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळले आणि १४ सामन्यांत फक्त ४ विजय मिळवून ८ गुणांसह दहाव्या क्रमांकावर राहिले. २०१९ व २०२० मध्ये सलग दोन पर्व जिंकल्यानंतर पुढील तीन वर्षांत त्यांना फक्त एकदाच प्ले ऑफमध्ये प्रवेश करता आला आहे. २०२२मध्येही ते गुणतालिकेत शेवटच्या क्रमांकावर होते. हार्दिकच्या नेतृत्वाखाली MI नव्या सुरुवातीसाठी तयार होते, परंतु चाहत्यांचा रोष आणि त्यातून हार्दिकवर झालेल्या टीकेचा संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला.
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
संघातील वरिष्ठ खेळाडू म्हणून माजी कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) फ्रँचायझीच्या या निर्णयावर नाराज असल्याची चर्चा संपूर्ण हंगामात सुरू होती. त्यामुळे वानखेडे स्टेडियमवरील अखेरचा साखळी सामना हा रोहितचा या फ्रँचायझीकडून शेवटचा असल्याची चर्चा सुरू आहे. LSG विरुद्धच्या या सामन्यात रोहितने अर्धशतकी खेळी केली आणि जेव्हा तो बाद झाला, तेव्हा चाहत्यांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला, जणू हा त्याचा शेवटचा सामना आहे. आयपीएल २०२५ पूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे आणि सर्व संघात बरेच बदल पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे रोहित MI सोबत राहतो का, या प्रश्नाचे उत्तर तेव्हाच मिळेल..
मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या सामन्यानंतर संघ मालक नीता अंबानी ( Nita Ambani) या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी ड्रेसिंग रुममध्ये पोहोचल्या आणि त्यात त्यांनी रोहितला शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, ''आपल्याला जसे अपेक्षित होते, तसे हे पर्व गेले नाही. पण, तरीही मी मुंबई इंडियन्सची मोठी चाहती आहे. हे मी फक्त मालक म्हणून नाही बोलत आहे. मुंबई इंडियन्सची निळी जर्सी परिधान करणे हे खूप मोठं भाग्य आहे आणि या फ्रँचायझीची मालक असण्याचा मलाही अभिमान आहे. हे मी माझे भाग्य समजते. आपलं नेमकं काय चुकले, यावर चर्चा होईल. पण, सध्या जगाचं लक्ष आपल्या मोठ्या स्पर्धेकडे आहे.''
मिशन वर्ल्ड कप...
रोहित शर्माने आता सर्व लक्ष २ जूनपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेकडे वळवले आहे. भारतीय संघ १ जूनला बांगलादेशविरुद्ध एकमेव सराव सामाना खेळेल. भारताला अ गटात अमेरिका, कॅनडा, पाकिस्तान आणि आयर्लंडचा सामना करायचा आहे. भारतीय संघ सुरुवातीला आयपीएल लीग स्टेजच्या समाप्तीनंतर लगेचच २१ मे रोजी न्यूयॉर्कला रवाना होणार होता. पण, आता संघ २५ व २६ मे रोजी दोन बॅचमध्ये रवाना होणार आहे. न्यू यॉर्कमध्ये भारताचे लीग सामने ५ जून (वि. आयर्लंड), ९ जून ( वि. पाकिस्तान ) आणि १२ जून ( वि. अमेरिका ) रोजी होणार आहेत. कॅनडाविरुद्धचा अंतिम लीग सामना १५ जून रोजी फ्लोरिडामध्ये होणार आहे.
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह. राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद