Join us

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला पाक क्रिकेट बोर्डानं पाठवली कायदेशीर नोटीस; जाणून घ्या त्यामागचं कारण...

काय आहे प्रकरण अन् कोण आहे तो खेळाडू? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:41 IST

Open in App

जगातील लोकप्रिय आयपीएल स्पर्धेचा माहोल सेट झाला आहे. भारतीय खेळाडूंसह परदेशातील स्टार क्रिकेटर यंदाच्या हंगामासाठी सज्ज झाले आहेत. एका बाजूला या स्पर्धेत सहभागी संघ आणि त्यातील खेळाडूंची चर्चा रंगत असताना आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतलेला एक निर्णय चर्चेत आला आहे. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील ऑलराउंडर खेळाडूला पाकिस्तानमधून कायदेशीर नोटीस धाडण्यात आली आहे. इथं जाणून घेऊयात काय आहे प्रकरण अन् कोण आहे तो खेळाडू ज्याला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नोटीस पाठवलीये त्यासंदर्भातील माहिती 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

कोण आहे तो खेळाडू? कोणत्या कारणास्तव पाकिस्तानमधून आलीये कायदेशीर नोटीस

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या कॉर्बिन बॉश याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. पाकिस्तान सुपर लीग ((Pakistan Super League)) स्पर्धेसाठी केलेला करार मोडून त्याने नियमांचे उल्लंघन केले आहे, असा आरोप पीसीबीनं दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूवर केला आहे.

IPL ची ऑफर मिळाली अन् पाकिस्तानला दाखवला ठेंगा

भारतातील आयपीएल स्पर्धेदरम्यानच  पाकिस्तान सुपर लीगचा थरारही रंगणार आहे.  ११ एप्रिल ते १८ मे या कालावधीत पाकिस्तानमधील यंदाची पीएसएल स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेचा कॉर्बिन बॉश हा पेशावर झल्मी या फ्रँचायझी संघाच्या ताफ्यात सामील झाला होता. पण आयपीएलमध्ये खेळण्याची ऑफर मिळताच त्याने या स्पर्धेतून आपलं नाव माघार घेण्याचा निर्णय घेतला. या गोष्टीमुळे आता या खेळाडूला कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

लिझाद विल्यम्सच्या जागी मुंबई इंडियन्सनं बॉशला दिली संधी

आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सच्या संघानं दक्षिण आफ्रिकेच्या लिझाद विल्यम्स याला ७५ लाख या मूळ किंमतीसह आपल्या ताफ्यात घेतले होते. पण दुखापतीमुळे स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच या खेळाडूवर माघार घेण्याची वेळ आली. मग मुंबई इंडियन्सच्या संघानं त्याच्या बदली खेळाडूच्या रुपात कॉर्बन बॉशला संघात स्थान दिले. तो पाकिस्तानची स्पर्धा सोडून आयपीएलमध्ये आला ही गोष्ट पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला खटकली अन् त्यांनी आता या खेळाडूला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.  

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्सपाकिस्तानटी-20 क्रिकेटद. आफ्रिका