Join us  

आरसीबीचा संघ प्ले ऑफमधून बाहेर होताच मुंबईचं जोरदार सेलिब्रेशन; गिलने षटकार मारला अन्...

मुंबईचा संघ आरसीबी आणि गुजरात यांच्यातील सामन्याच्या निकालाची वाट पाहत होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 10:49 AM

Open in App

प्ले ऑफसाठी विजय आवश्यक असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला (आरसीबी) अखेर थोडक्यात अपयश आले. विराट कोहलीच्या विक्रमी शतकानंतर आरसीबीला शुभमन गिलच्या नाबाद शतकी तडाख्याचा सामना करावा लागला. या जोरावर गुजरात टायटन्सने ६ गड्यांनी बाजी मारताना आरसीबीला यंदाच्या आयपीएलमधून बाहेर केले. तसेच, गुजरातच्या विजयाचा फायदा झालेल्या मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

मुंबईचा संघ आरसीबी आणि गुजरात यांच्यातील सामन्याच्या निकालाची वाट पाहत होता. अशा स्थितीत शुभमन गिलने षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले, तर दुसरीकडे आरसीबीचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला. एवढेच नाही तर गिलचा षटकार पाहून मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी सेलिब्रेशन करायला सुरुवात केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मुंबईचे खेळाडू गुजरातच्या विजयानंतर आपला संघ जिंकल्यासारखा आनंद साजरा करत होते.

रोमांचक झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला (आरसीबी) ६ गड्यांनी नमवले. यामुळे आरसीबीचे यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले असून गुजरातने मिळवलेल्या विजयाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. याआधी झालेल्या सामन्यात मुंबईने हैदराबादला ८ गड्यांनी नमवले होते.

प्ले ऑफ गाठण्यासाठी आरसीबीला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक होता. स्टार फलंदाज विराट कोहलीच्या धडाकेबाज नाबाद शतकाच्या जोरावर आरसीबीने जवळजवळ अर्धी लढाई जिंकली होती. परंतु, यानंतर शुभमन गिलने त्याच तोडीची खेळी करत नाबाद शतक झळकावत गुजरातला विजयी केले. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर आरसीबीने २० षटकांत ५ बाद १९७ धावा केल्या. गुजरातने १९.१ षटकांत ४ बाद १९८ धावा केल्या.

टॅग्स :मुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोररोहित शर्माआयपीएल २०२३
Open in App