IPL 2024 Mumbai Indians players in alibaug ( Marathi News ) : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चे व्यग्र वेळापत्रक सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचे खेळाडू टीम बाँडिंगसाठी अलिबागला पोहोचले आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ IPL 2024 मध्ये खेळणार आहे. पण, अजूनही रोहित शर्माच्या चाहत्यांना हा निर्णय पटलेला नाही. कर्णधार म्हणून पहिल्याच पत्रकार परिषदेत जेव्हा हार्दिकला हिटमॅनबाबत प्रश्न विचारले गेले, तेव्हा त्याचा चेहराही पडलेला दिसला. फ्रँचायझीच्या निर्णयानंतर रोहितसोबत बोलणं झालं नसल्याचेही त्याने कबुल केले. त्याचवेळी मुंबई इंडियन्सने पोस्ट केलेल्या व्हिडीओतही रोहित व हार्दिक हे अंतर ठेवून बसल्याचे दिसले. आता MI च्या टीम बाँडिंग दौऱ्यावरही रोहित न दिसल्याने कुछ तो गडबड है अशी चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई इंडियन्सचे सर्व खेळाडू काल गेट वे ऑफ इंडिया येथून बोटीने अलिबागला गेले. हार्दिक पांड्या, इशान किशन यांच्यासोबत मुंबईचे सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ सदस्य होते. पुढील काही दिवस हे सर्व अलिबागमध्येच एन्जॉय करणार आहेत आणि तेथून मुंबईत परत येऊन अहमदाबादच्या दिशेने रवाना होणार आहेत. तेथे त्यांचा पहिला सामना २०२२च्या विजेत्या गुजरात टायटन्सविरुद्ध आहे. पण, अलिबागमध्ये जेव्हा मुंबई इंडियन्सचे खेळाडू दाखल झाले, तेव्हा त्यात रोहित शर्मा दिसला नाही. हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्ताने असा दावा केला आहे.