IPL 2022 : भारताचा धडाकेबाज फलंदाज हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्स हे समीकरण फार जुनं आहे. पण आता मात्र हार्दिक CVC Capital Partners ने विकत घेतलेल्या अहमदाबाद फ्रँचायझीकडून खेळताना दिसणार आहे. IPL 2022 मध्ये आठ ऐवजी दहा संघ खेळणार असल्याने जुन्या आठ संघांना ठराविक खेळाडू स्वत:च्या संघात ठेवून बाकीचे खेळाडू करारमुक्त करावे लागले. त्यात मुंबई इंडियन्सने हार्दिकला संघातून मुक्त केलं. त्यानंतर त्याला अहमदाबाद संघाने विकत घेतलं असून तो संघाचे नेतृत्व करणार असल्याचे नक्की ठरले. या अधिकृत घोषणेनंतर मुंबई इंडियन्स संघाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबद्दल प्रतिक्रिया देण्यात आली.
हार्दिक पांड्याला मुंबईने करारमुक्त केलं असलं तरीही मेगा लिलावात त्याला मुंबईचा संघ परत विकत घेईल असं बोललं जात होतं. पण अहमदाबाद संघाने त्याला १५ कोटींच्या रकमेवर करारबद्ध केलं. त्यामुळे आता हार्दिक मुंबईकडून खेळणार नाही हे नक्की झालं. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करण्यात आली. त्यात हार्दिकचा फोटो पोस्ट करून 'कुंफू पांड्या, तुला खूप शुभेच्छा! लवकरच मैदानावर भेट होईल', असा खास संदेश त्याला देण्यात आला.
हार्दिकवर किती बोली लागणार याकडे साऱ्यांचंच लक्ष होतं. CVC Capital Partners या कंपनीने अहमदाबाद संघाचे मालकी हक्क जिंकले. पण या कंपनीची बेटींग कंपनीत गुंतवणूक असल्याचं बोललं गेल्याने थोडे दिवस या संघाला मान्यता देण्यावरून विचारविनिमय सुरू होता. अखेर काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने संघाला मान्यता दिली. त्यानंतर संघाने हार्दिक पांड्यासह राशिद खान आणि शुबमन गिल या दोघांनाही संघात घेतलं आहे. तसेच, या संघाने कोचिंग स्टाफचीही निवड केलेली आहे. भारताचा माजी जलदगती गोलंदाज आशिष नेहरा, दक्षिण आफ्रिकेचे माजी फलंदाज गॅरी कर्स्टन कोचिंग स्टाफमध्ये आहेत. तर इंग्लंडचा माजी खेळाडू विक्रम सोलंकी हा या संघाचा संचालक म्हणून कार्यरत असणार आहे.