मुंबई : अडखळत्या सुरुवातीनंतर सलग दोन विजय मिळवून फॉर्ममध्ये आलेल्या मुंबई इंडियन्सपुढे बुधवारी घरच्या मैदानावर किंग्स इलेव्हन पंजाबचे कडवे आव्हान आहे. मुंबईकर ६ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानी असून, पंजाब ८ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.
वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात मुंबईला नमविण्यासाठी पंजाबला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. या आधी मोहाली येथे पंजाबने मुंबईला ८ गड्यांनी नमविले होते. याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी आता मुंबईकरांनी कंबर कसली आहे. गेल्या सामन्यात मुंबईचा तारणहार ठरलेला वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ याच्याकडून पुन्हा एकदा भेदक गोलंदाजीची संघाला अपेक्षा असेल.
मुंबईने बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्स व सनरायझर्स हैदराबाद यांना सलग नमवून विजयी कूच केली आहे. दोन्ही संघांना मुंबईकरांनी कमी धावसंख्येच्या सामन्यात पराभूत केले असल्याने, पंजाबच्या फलंदाजांना मुंबईच्या तगड्या गोलंदाजीपुढे सावधपणे खेळावे लागेल.