Join us

Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच

Mumbai Indians Ishan Kishan, Syed Mustaq Ali Trophy: इशान किशनच्या फटकेबाजीमुळे संघाने अवघ्या २७ चेंडूत मिळवला विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 21:43 IST

Open in App

Mumbai Indians Ishan Kishan, Syed Mustaq Ali Trophy: टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनला नुकत्याच झालेल्या IPL Auction 2025 मध्ये चांगला भाव मिळाला. मुंबई संघाने त्याच्याकडे पाठ फिरवली असली तर काव्या मारनच्या हैदराबादने त्याला संघात घेतले. त्यानंतर इशान किशनच्या बॅटमधून आज तुफानी इनिंग पाहायला मिळाली. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 मध्ये त्याने अवघ्या २७ चेंडूत झारखंडला सामना जिंकून दिला. त्याने तब्बल ९ षटकार खेचले.

इशान किशनचे 'तुफान'

अरुणाचल प्रदेश आणि झारखंड यांच्यातील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात अरुणाचल प्रदेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली मात्र अरुणाचल प्रदेश संघ २० षटकांत केवळ ९३ धावा करत सर्वबाद झाला. अशा स्थितीत झारखंडसमोर सामना जिंकण्यासाठी ९४ धावांचे लक्ष्य होते. झारखंडचा फलंदाज इशान किशनने हे लक्ष्य अगदी सोपे करून टाकले. आणि अवघ्या ४.३ षटकांत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

झारखंडकडून लक्ष्याचा पाठलाग करताना इशान किशन आणि उत्कर्ष सिंग यांनी डावाला सुरुवात केली आणि दोन्ही खेळाडू नाबाद माघारी परतले. उत्कर्ष सिंगने केवळ ६ चेंडू खेळले आणि १३ धावा केल्या. दुसरीकडे इशान किशनने चौकार आणि षटकार ठोकत तुफान खेळी केली. त्याने ३३४ च्या स्ट्राईक रेटने २३ चेंडूत नाबाद ७७ धावा कुटल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ९ षटकार ठोकले. इशान किशनने एकहाती संघाच्या विजयात ८१ टक्के धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.

आगामी IPL मध्ये इशान किशन SRH मध्ये...

दरम्यान, आगामी आयपीएल हंगामासाठी इशान किशन सनरायजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार आहे. मेगा लिलावात त्याच्यावर ११ कोटी २५ लाखांची बोली लागली. इशान किशन हा २०१८ पासून मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. पण आता मात्र तो SRH मधून खेळताना दिसणार आहे.

टॅग्स :इशान किशनमुंबई इंडियन्सआयपीएल लिलाव