Hardik Pandya Mumbai Indians IPL 2022: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या IPL 2022 मधून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणार आहे. टी२० विश्वचषकानंतर हार्दिक पांड्या खेळापासून दूर होता. त्याने आपलं लक्ष फिटनेसवर केंद्रित केलं होतं. पण आता हार्दिक IPL खेळणार असून अहमदाबाद टायटन्स संघाचं नेतृत्वदेखील करणार आहे. याचदरम्यान हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समधील एक नवीनच गोष्ट समोर आली असून त्यानंतर विविध चर्चांना उधाण आले आहे.
हे आहे खरं कारण
एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार व्हायचं होतं आणि त्याने याबाबत फ्रेंचायझी, संघ व्यवस्थापन यांनाही सांगितलं होतं. मात्र, फ्रँचायझीची त्याच्या या मतावर सहमती होऊ शकली नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याचे नाव रिटेन्शन लिस्टमध्ये समाविष्ट केले नाही.
सुरुवातीपासूनच पांड्या बंधू मुंबईत!
जेव्हा मुंबई इंडियन्सने पांड्या बंधूंना करारमुक्त केलं तेव्हा सारेच आश्चर्यचकित झाले होते. कारण हार्दिक आणि कृणाल पांड्या यांना मुंबई इंडियन्समुळेच ओळख मिळाली होती आणि दोघेही सुरुवातीपासूनच याच संघाशी संबंधित होते. कर्णधार रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार असताना त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा IPL ट्रॉफी जिंकली. त्या संघात पांड्या बंधूचा प्रामुख्याने समावेश होता.
हार्दिक आता अहमदाबाद टायटन्सचा कर्णधार
हार्दिक पांड्या प्रथमच IPL मध्ये सहभागी होणाऱ्या अहमदाबाद संघाचा कर्णधार बनला आहे. त्याला १५ कोटींना करारबद्ध करण्यात आलं आहे. हार्दिक पांड्याने IPL पूर्वी कोणतेही देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास नकार दिला. त्याने रणजी स्पर्धेतही सहभाग घेतलेला नाही. त्यामुळे आता त्याला स्वत:ला IPL च्या माध्यमातून सिद्ध करायचं आहे.