Join us  

मुंबई इंडियन्सनं पोस्ट केली रोहित शर्माची नेमप्लेट, काय आहे यामागचं कारण?

इंडियन प्रीमिअर लीगच्या 2020 (आयपीएल 2020) मोसमासाठी सर्व संघांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 12:07 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या 2020 (आयपीएल 2020) मोसमासाठी सर्व संघांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. कोलकाता येथे पार पडलेल्या लिलावात प्रत्येक संघांनी आपापला संघ मजबूत करण्याच्या दृष्टीनं काही खेळाडूंना आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. कोलकाता नाइट रायडर्सनं ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिन्ससाठी सर्वाधिक 15.50 कोटी रक्कम मोजली. आयपीएलच्या इतिहासातील कमिन्स हा दुसरा महागडा खेळाडू ठरला. या लिलावात टॉप टेन महागड्या खेळाडूंमध्ये मुंबई इंडियन्सचा समावेश नाही. पण, मुंबईनं ख्रिस लीनसारख्या तगड्या खेळाडूला दोन कोटींत आपल्या ताफ्यात घेतले. 

जसप्रीत बुमराहचे तंदुरुस्त होणं ही मुंबई इंडियन्ससाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. पण, बुधवारी मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माची नेमप्लेट सोशल मीडियावर पोस्ट टाकून सर्वांना बुचकळ्यात टाकले. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने सर्वाधिक चार जेतेपदं पटकावली. याशिवाय रोहितनेच मुंबई इंडियन्सला चॅम्पियन्स लीगचे जेतेपदही पटकावून दिले. पण, मग मुंबई इंडियन्सनं आज रोहितच्या नावाची पाटी का पोस्ट केली?

2011 मध्ये मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले होते. डेक्कन चार्जर्स संघाचा रोहित 2011पासून ते आतापर्यंत सलग 9 मोसमात मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रोहितनं 188 सामन्यांत 1 शतक व 36 अर्धशतकांसह 31.60च्या सरासरीनं 4898 धावा केल्या. त्याच्या नावावर 15 विकेट्सही आहेत. रोहितच्या 9 वर्षांच्या प्रवासाला उजाळा देताना मुंबई इंडियन्सने ती नेम प्लेट पोस्ट केली आहे...

2011च्या लिलावात मुंबईनं दोन कोटींत रोहितला आपल्या ताफ्यात केलं. 2012च्या आयपीएलमध्ये त्यानं कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध 109* धावांची खेळी केली. मुंबई इंडियन्सनं 2013मध्ये रोहितकडे संघाचे नेतृत्व दिलं. त्याच वर्षी मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा आयपीएलचे जेतेपद नावावर केले. त्याच वर्षी मुंबई इंडियन्सनं चॅम्पियन्स लीग जिंकली. त्यानंतर 2015, 2017 आणि 2019मध्ये रोहितच्याच नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएल जेतेपद नावावर केले. आता 2020मध्ये जेतेपदाचा पंच मारण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज आहे.

टॅग्स :रोहित शर्मामुंबई इंडियन्सआयपीएल 2020आयपीएल लिलाव 2020