मुंबई : जगातील सर्वात मोठी ट्वेंटी-२० लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीग सर्व क्रिकेट विश्वावर राज्य करत आहे. आयपीएलचे पर्व सुरू होताच आंतरराष्ट्रीय क्रिकेट देखील पडद्यामागे जाते. जगभरात मोठ्या प्रमाणात आयपीएलचा प्रचार करणारे आणि स्पर्धेचा आनंद घेणारे चाहते असंख्य आहेत. आयपीएलचा सध्या सोळावा हंगाम सुरू आहे, सोळा वर्षांच्या कालावधीत अनेक नाट्यमय घडामोडी, अनेक सुपरस्टार खेळाडू आयपीएलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला दिले. मुंबई इंडियन्स स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे, रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पाचवेळा स्पर्धेचा किताब पटकावला. पण मुंबई इंडियन्स म्हणजे सुपरस्टार खेळाडू घडवणारं विद्यापीठ म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. कारण याला काही माजी खेळाडूंनी देखील दुजोरा दिला आहे.
मुंबईच्या फ्रँचायझीने भारतीय क्रिकेटला अनेक सुपरस्टार खेळाडू दिले. यामध्ये हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन अशा काही खेळाडूंचा साठा आहे. मुंबई इंडियन्स सुपरस्टार तयार करणारी 'फॅक्टरी' आहे, असे अनेक क्रिकेट जाणकारांनी नमूद केलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहने भारतीय संघात जागा मिळवली. बुमराह हा आताच्या घडीला क्रिकेटपासून दूर असला तरी भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग आहे. यंदाच्या हंगामाच्या सुरूवातीला मुंबईच्या संघाला देखील बुमराहची अनुपस्थिती जाणवत होती. तर हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सच्या संघाचा कर्णधार आहे, शिवाय तो भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपदही भूषवत आहे.
हार्दिक पांड्याने २०१५ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. कायरन पोलार्ड अन् हार्दिक पांड्या या जोडीनं २०२१ पर्यंत मुंबईच्या संघासाठी फिनीशरची भूमिका पार पाडली. हार्दिकने मुंबईसाठी ६१ सामने खेळले असून ५३ डावांत ९२१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यानं ९१ धावांची सर्वोत्कृष्ट खेळी केली. आयपीएलमध्ये अद्याप शतकी खेळीच्या शोधात असलेल्या पांड्याच्या नावावर मुंबईकडून खेळताना ३ अर्धशतकी खेळींची नोंद आहे. हार्दिकने गोलंदाजीतूनही सगळ्यांना प्रभावित केले. मुंबईचा प्रभावी फिनीशर म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या हार्दिकने स्वत:ला सिद्ध केले अन् भारतीय संघात जागा मिळवली.
'सुपरस्टार' घडवणारं विद्यापीठमुंबईतील युवा खेळाडूंच्या यशाचे श्रेय अनेक आजी माजी खेळाडूंनी हिटमॅन रोहितला दिलं आहे. मुंबईची फ्रँचायझी म्हणजे सुपरस्टार खेळाडू घडवणारं विद्यापीठ आहे, असं इरफान पठाणनं म्हटलंय. यंदा देखील मुंबईनं युवा खेळाडूंना प्राधान्य देताना भारतीय क्रिकेटचे भवितव्य ठरवणारे शिलेदार घडवले आहेत. यामध्ये तिलक वर्मा, नेहाल वढेरा, आकाश मधवाल यांसारख्या युवा खेळाडूंचा समावेश आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत, जी रोहितचं कौतुक करण्यास भाग पाडतात. रोहितच्या नेतृत्वात खेळलेला हार्दिक पांड्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रमुख चेहरा बनला आहे.
IPL २०२३ मध्ये मुंबईच्या युवा खेळाडूंचा जलवा आयपीएल २०२३ मध्ये देखील मुंबईच्या ताफ्यातील युवा शिलेदारांनी सर्वांना प्रभावित केले. तिलक वर्माने यंदाच्या हंगामात १० सामन्यांमध्ये ३०० धावा कुटल्या असून मधल्या फळीतील प्रभावी फलंदाज म्हणून तो समोर आला आहे. याशिवाय नेहाल वढेराने १३ सामन्यांतील ९ डावांमध्ये २३७ धावा केल्या आहेत. तसेच आकाश मधवालने एलिमिनेटरच्या सामन्यात ५ धावा देऊन ५ बळी पटकावले. आकाशने ७ सामन्यांत १३ बळी घेऊन महत्त्वाच्या सामन्यांमध्ये संघाचा 'भार' कमी केला.
अलीकडेच भारतीय संघाचा आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने तिलक वर्मा आणि नेहाल वढेरा हे भारतीय संघाचे भविष्यातील सुपरस्टार असतील असं म्हटलं आहे. तसेच लोक बोलतात मुंबईतून एवढे खेळाडू पुढे कसे येतात, पण त्यासाठी आम्ही मेहनत घेत असल्याचे हिटमॅनने सांगितले. "मुंबई इंडियन्स हे एक असं विद्यापीठ आहे, जेथील पदवी तुम्हाला सुपरस्टार बनवते", असं इरफान पठाणनं म्हटलंय.