आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळताना दिसलेल्या विष्णू विनोदनं IPL मेगा लिलावाआधी वादळी खेळीनं लक्षवेधून घेतलं आहे. केरळा क्रिकेट लीग टी-२० स्पर्धेत विकेट किपर बॅटरनं उत्तुंग षटकार आणि खणखणीत चौकारांच्या मदतीने स्पर्धेतील सर्वात जलद शतक झळकावले.
किती चेंडूत आली त्याची ही फास्टर सेंच्युरी?
स्फोटक अंदाजातील खेळीनं त्याने आगामी आयपीएल लिलावात तगडी कमाई करणाऱ्या भिडूंच्या यादीत स्थान मिळवण्यासाठी उत्सुक असल्याचे संकेत दिले आहेत. केरळा क्रिकेट लीग टी-२० स्पर्धेत शुक्रवारी त्रिशूर टायटन्स विरुद्ध एलेप्पी रिप्पल यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात ३० वर्षीय विष्णू विनोद याने आपल्या भात्यातून धमाकेदार शॉट्सचा नजराणा पेश केला. फक्त ३३ चेंडूत त्याने शतक पूर्ण केले.
३०८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १३९ धावा
एवढ्यावरच तो थांबला नाही तर ३०८ च्या स्ट्राइक रेटनं फलंदाजी करताना त्याने १३९ धावांची खेळी केली. त्याच्या या स्फोटक खेळीत १७ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता. टायटन्सकडून खेळणाऱ्या विष्णूच्या तुफानी फटकेबाजीसमोर एलेप्पी रिप्पलच्या गोलंदाजांचा अक्षरश: विनोद झाला. टायटन्सच्या संघाने हा सामना ८ गडी राखून खिशात घातला.
IPL मेगा लिलावाआधी मोठा धमाका
विष्णू विनोद आयपीएल २०२४ च्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. पण दुखापतीमुळे त्याने गत हंगामातून माघार घेतली होती. आता आगामी आयपीएलच्या मेगा लिलावाआधी तुफान खेळीसह त्याने तगडी कमाई करण्यासाठी कंबर कसल्याचे दिसते. मुंबई इंडियन्सचा संघ त्याला रिटेन करणार की, तो लिलावात दिसणार ते पाहण्याजोगे असेल.
कोण आहे विष्णू विनोद? तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये कोणत्या संघाकडून खेळतो?
विष्णू विनोद हा उजव्या हाताने फलंदाजी करणारा विकेट किपर बॅटर आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो केरळाच्या संघातून खेळतो. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने २८ सामने खेळले असून यात त्याच्या खात्यात १०४० धावांची नोंद आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ५३ सामन्यात १७७३ धावा काढल्या असून टी-२० मध्ये त्याच्या खात्यात १५९१ धावांची नोंद आहे.
मॅचमध्ये काय घडलं?
विष्णू विनोदच्या त्रिशूर टायटन्स संघाने या सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. एलेप्पी संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित २० षटकात ६ बाद १८१ धावा केल्या. त्रिशूर टायटन्स संघाने १८२ धावांचे टार्गेट १२.४ षटकात ८ गडी राखून पूर्ण केले.. यात एकट्या विष्णू विनोदच्या १३९ धावांचा समावेश होता.