नवी दिल्ली : सलग दोन विजयांमुळे मनोधैर्य उंचावलेला मुंबई इंडियन्स संघ मंगळवारी येथे इंडियन प्रीमियर लीगच्या लढतीत तळाच्या स्थानी असलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजयाचा प्रबळ दावेदार असेल.
मुंबईने गेल्या लढतीत किरोन पोलार्डच्या आक्रमक खेळीच्या जोरावर फॉर्मात असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सचा ४ गड्यांनी पराभव केला होता. दुसऱ्या बाजूचा विचार करता, सनरायझर्सला राजस्थान रॉयल्सविरुद्ध ५५ धावांनी लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. यंदाच्या पर्वातील सात सामन्यांतील हा त्यांचा सहावा पराभव आहे. संघ बदलाच्या स्थितीत असून, त्यात फॉर्मात नसलेल्या डेव्हिड वॉर्नरकडून कर्णधारपद विलियम्सनकडे सोपविण्यात आले.
मुंबईचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (२५०) व क्विंटन डिकॉक (१५५ धावा) पुन्हा एकदा पाचवेळच्या चॅम्पियन संघाला चांगली सुरुवात करून देण्याव्यतिरिक्त मोठी खेळी करण्यास उत्सुक असतील.
मुंबईची मधली फळी गेल्या दोन सामन्यांत चांगली कामगिरी करण्यात यशस्वी ठरली. ही संघ व्यवस्थापनासाठी दिलासा देणारी बाब आहे. चेन्नईविरुद्ध ३४ चेंडूंमध्ये नाबाद ८७ धावांची सामना जिंकून देणारी खेळी करणारा पोलार्ड (१६८ धावा) कामगिरीत सातत्य राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.
कृणाल पांड्या (१०० धावा), हार्दिक पांड्या (५२ धावा) आणि सूर्यकुमार यादव प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवण्यास सक्षम आहेत. मुंबई संघ निशामच्या स्थानी इशान किशन किंवा जयंत यादव यापैकी एकाला संधी देतो किंवा नाही, याबाबत उत्सुकता आहे.
कारण निशामला फलंदाजी किंवा गोलंदाजीमध्ये विशेष छाप सोडता आलेली नाही. दरम्यान, सनरायझर्स संघाच्या अडचणींमध्ये आणखी भर पडत आहे. संघ आघाडीच्या फळीतील फलंदाजांच्या कामगिरीवर अधिक अवलंबून आहे, विशेषत: जॉनी बेयरस्टॉ (२४८ धावा), पण मधल्या फळीने संघाला अनेक लढतींमध्ये निराश
केले आहे.
Web Title: Mumbai Indians strong contenders against Hyderabad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.