इंडियन प्रीमिअर लीग २०२३साठी मुंबई इंडियन्सने ८ कोटी रुपये मोजून इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) याला आपल्या संघात दाखल करून घेतले. आयपीएल २०२२मध्येच हा करार झाला होता, परंतु दुखापतीमुळे आर्चर खेळला नव्हता... यंदा तो तंदुरुस्त होऊन मैदानावर उतरला खरा, परंतु ५ सामने खेळून तो पुन्हा इंग्लंडला रवाना झाला. पण, याचा अर्थ जोफ्रा आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझीच्या भविष्यातील योजनेतून बाद झालाय, असा होत नाही. हाती आलेल्या वृत्तानुसार मुंबई इंडियन्स इंग्लंडच्या गोलंदाजाला दीर्घकालीन करार देऊ इच्छित आहेत आणि त्यासाठी MI मोठी रक्कम मोजण्याच्या तयारीत आहे.
Dailymail.co.uk ने दिलेल्या वृत्तात हा दावा केला गेला आहे, की मुंबई इंडियन्सने आर्चरला मोठी ऑफर दिली आहे. या करारातील नियमानुसार जोफ्राला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला मुंबई इंडियन्सची परवानगी घ्यावी लागणार आहे. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीची एकच टीम नाही, त्यात महिला प्रीमिअर लीगमध्येही टीम आहे आणि शिवाय अनेक लीगमध्ये त्यांचा संघ खेळतोय. मुंबई इंडियन्स फँचायझीच्या आयपीएल आणि दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगमधील संघांचा जोफ्रा सदस्य आहे.
मुंबई इंडियन्सच्या दीर्घकालीन कराराबाबत अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा इंग्रजी वेबसाईटला देता आलेला नाही. जोफ्रा मागील दोन वर्षांत फार क्रिकेट खेळलेला नाही. त्याने या वर्षी दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगमधून पदार्पण केले आणि त्यानंतर तो केवळ ११ सामने खेळला आहे. मनगटाच्या दुखापतीमुळे जोफ्रा इंग्लंडमध्ये परतला आहे आणि अॅशेस मालिकेपूर्वी तो उपचार घेऊन तंदुरुस्त होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. फेब्रुवारी २०२१ नंतर जोफ्रा कसोटी क्रिकेट खेळलेला नाही. dailymail.co.uk च्या वृत्तानुसार अॅलेक्स हेल्ससाही फ्रँचायझी दीर्घकालीन करार देण्याच्या तयारीत आहेत.