गुजरातचा विकेट किपर बॅटर उर्विल पटेल हा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करताना दिसतोय. या स्पर्धेतील पहिल्या शतकासह त्याने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतकी खेळी करणारा पहिला भारतीय होण्याचा खास विक्रम नोंदवला. त्यानंतर आता त्याच्या भात्यातून सलग दुसरं शतक आल्याचे पाहायला मिळाले. ४० किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत टी २० क्रिकेटमध्ये दोन शतके झळकवणारा तो पहिला बॅटर ठरलाय. या विक्रमी कामगिरीच्या जोरावर अनसोल्ड राहूनही तो आयपीएलमध्ये एन्ट्री मारू शकतो.
उर्विल पटेल हा आयपीएलच्या मेगा लिलावातही ३० लाख रुपये मूळ किंमतीसह सहभागी झाला होता. पण त्याच्यावर एकाही फ्रँचायझी संघाने बोली लावली नाही. आता त्याची स्फोटक खेळी पाहिल्यावर सर्वच फ्रँचायझी संघांना पश्चाताप होत असेल. ही चूक भरून काढण्यासाठी काही फ्रँचायझींना संधीही आहे. जाणून घेऊयात कोणता फ्रँचायझी गुजरातच्या या पठ्ठ्यावर डाव खेळून संधी साधू शकतो त्यासंदर्भातील माहिती
राजस्थान रॉयल्सच्या संघाने ६ खेळाडू रिटेन केल्यावर मेगा लिलावात १४ खेळाडूंवर बोली लावली होती. त्यांच्या ताफ्यात एका आक्रमक फंलदाजाची गरज आहे. पर्समध्ये ३० लाख रुपये शिल्लक असल्यामुळे ते या युवा खेळाडूला आपल्या ताफ्यात सामील करून घेण्याचा डाव सहज साध्य करू शकतात.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
RCB च्या पर्समध्ये ७५ लाख एवढी राशी शिल्लक आहे. मेगा लिलावातील शॉपिंगसह या संघानं २२ खेळाडूंसह संघ बांधणी केली आहे. भारतीय फलंदाजांच्या रुपात RCB च्या ताफ्यात पुरेसे पर्याय उपलब्ध दिसत नाहीत. या संघासाठी उर्विल पटेल हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. त्यामुळे संधी मिळाली की, RCB चा संघ त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेण्याचा डाव खेळण्यात मागे राहणार नाही.
मुंबई इंडियन्सच्या संघाने आगामी हंगामासाठी संघ बांधणी करताना गोलंदाजांवर अधिक फोकस केल्याचे दिसून येते. या संघाच्या ताफ्यात १० गोलंदाज आहेत. टॉप ऑर्डरमध्ये भारतीय फलंदाजी करणारा चेहरा मिळत असेल, तर तेही या खेळाडूला आपल्या ताफ्यात सामील करून घेऊ शकतात. मुंबई इंडियन्स संघ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी ओळखला जातो. उर्विल पटेल याला ताफ्यात घेण्याऐवढी रक्कम त्यांच्या पर्समध्येही आहे. ते हा डाव साधणार का ते पाहण्याजोगे असेल.