Join us  

Mumbai Indians vs Other franchises : IPL 2022 आधीच सुरू झाला वाद; मुंबई इंडियन्ससोबत वानखेडेवर खेळण्यास अन्य फ्रँचायझींचा विरोध!

Mumbai Indians vs Other franchises : २०१९नंतर प्रथमच इंडियन प्रीमिअर लीग ( IPL) पूर्णपणे भारतात होण्याच्या मार्गावर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 4:01 PM

Open in App

Mumbai Indians vs Other franchises : २०१९नंतर प्रथमच इंडियन प्रीमिअर लीग ( IPL) पूर्णपणे भारतात होण्याच्या मार्गावर आहे. कोरोना व्हायरसचे संकट अजूनही पूर्णपणे संपलेले नाही, त्यामुळे BCCI ने आयपीएल २०२२ ( IPL 2022) महाराष्ट्रातच खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डी वाय पाटील स्टेडियमवर आयपीएलचे सामने खेळवण्यात येतील आणि याबाबतची अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे. Cricbuzzने दिलेल्या माहितीनुसार  आयपीएल २०२२चे साखळी फेरीतील ५५ सामने मुंबईत, तर १५ सामने पुण्यात खेळवण्यात येणार आहेत. 

५५ सामने वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डी वाय पाटील स्टेडियम येथे खेळवण्यात येतील, तर पुण्याच्या स्टेडियमवर १५ सामने होणार आहेत, अशी माहिती Cricbuzz ने दिली आहे. त्यानंतर प्ले ऑफचे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येतील. Cricbuzzने आधी दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल २०२२ला  २६ किंवा २७ मार्चपासून सुरूवात होणार आहे. २९ मे रोजी अंतिम सामना खेळवण्यात येईल, प्ले ऑफचे स्थळ अद्याप ठरले नसले तरी अहमदाबादचा विचार सुरू आहे. आजच्या आयपीएल गव्हर्निंगा कांऊसिलच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल.

अन्य फ्रँचायझींचा विरोध...

बीसीसीआयचा हा निर्णय म्हणजे मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) हा एकमेव संघ असेल की जो त्यांच्या घरच्या मैदानावर ४ सामने खेळेल. पण, अन्य फ्रँचायझींनी या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार  फ्रँचायझींना मुंबई इंडियन्ससोबत वानखेडे स्टेडियमसोडून अन्य ठिकाणी खेळण्यास काही हरकत नाही. वानखेडे हे त्यांचे होम ग्राऊंड आहे आणि त्यामुळे तो अन्य फ्रँचायझींवर अन्याय ठरेल, असे त्यांचे मत आहे.

 ''अन्य संघांना घरच्या मैदानावर खेळण्यास मिळणार नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे सामने वानखेडेवर खेळवणे, हा अन्य फ्रँचायझींवर अन्याय असेल. गेली अनेक वर्ष मुंबई इंडियन्स येथे खेळतेय. फ्रँचायझींनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांना मुंबई इंडियन्सविरुद्ध डी वाय पाटील किंवा पुण्यात खेळण्यास काहीच हरकत नाही. ब्रेबॉर्न स्टेडियमही चालले.  BCCI या मुद्याचा विचार करेल, अशी आशा आहे,''असे मत फ्रँचायझींच्या सूत्रांनी व्यक्त केले.    

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, इशान किशन ( १५.२५ कोटी), डेवॉल्ड ब्रेव्हिस ( ३कोटी), बासील थम्पी ( ३० लाख), मुरुगन अश्विन ( १.६० कोटी), जयदेव उनाडकट ( १.३० कोटी),  मयंक मार्कंडे ( ६५ लाख) , एन तिलक वर्मा ( १.७० कोटी), संजय यादव ( ५० लाख), जोफ्रा आर्चर ( ८ कोटी), डॅनिएल सॅम्स ( २.६० कोटी), टायमल मिल्स ( १.५० कोटी) ,टीम डेव्हिड ( ८.२५ कोटी), अनमोलप्रीत सिंग ( २० लाख), रमणदीप सिंग ( २० लाख), आर्यन जुयल ( २० लाख),  रिले मेरेडिथ ( १ कोटी), मोहम्मद अर्षद खान ( २० लाख), हृतिक शोकीन ( २० लाख), फॅबियन अॅलन ( ७५ लाख), आर्यन जुनाल ( २० लाख), अर्जुन तेंडुलकर ( ३० लाख), राहुल बुद्धी ( २० लाख).

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्सबीसीसीआय
Open in App