mumbai indians । मुंबई : रविवारी आयपीएलमध्ये (IPL 2023) चाहत्यांना सुपर संडेचा आनंद घेता येणार आहे. उद्याच्या दिवसातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (MI vs KKR) यांच्यात होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यासाठी मुंबईच्या फ्रँचायझीने जय्यत तयारी केली आहे. उद्याचा सामना मुंबईचा संघ मुलींना समर्पित करणार असून १९,००० लेकी या सामन्याच्या साक्षीदार होणार आहेत. उद्या म्हणजेच 16 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स वानखेडेवर एक अनोखा उपक्रम साजरा करणार आहे. ३६ NGO मधील 19000 पेक्षा जास्त मुली आणि 200 निवडक मुले मुंबईच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी मैदानात हजेरी लावणार आहेत. लक्षणीय बाब म्हणजे हा विशेष सामना म्हणजे क्रीडा क्षेत्रातील महिलांचा उत्सव असल्याचे नीता अंबानी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीच्या मालक नीता अंबानी दरवर्षी हा अनोखा उपक्रम राबवत असतात. मुलींचे शिक्षण आणि खेळाच्या अधिकारावर प्रकाश टाकण्यासाठी हा उपक्रम राबवत असल्याचे यावेळी नीता अंबानी यांनी सांगितले. मुंबई इंडियन्सला आपल्या सुरूवातीच्या ३ सामन्यांमध्ये केवळ एका सामन्यात विजय मिळाला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा त्यांच्या घरात पराभव करून मुंबईने विजयाचे खाते उघडले. आताच्या घडीला मुंबईचा संघ गुणतालिकेत २ गुणांसह नवव्या स्थानावर स्थित आहे. उद्या कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध मुंबई आपला चौथा सामना खेळेल. या हंगामातील दुसरा सामना मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर खेळला होता. मात्र, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने यजमान मुंबईचा पराभव केला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"