Sachin Tendulkar Mumbai Indians, IPL 2023 MI vs DC: पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर अखेर, मुंबई इंडियन्सने यंदा आपला पहिला विजय नोंदवला. दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर त्यांनी रोमहर्षक विजय मिळवला. दोन ऑस्ट्रेलियन खेळाडू मैदानात मुंबईसाठी खेळत असताना शेवटच्या चेंडूवर २ धावा हव्या होत्या. त्यावेळी टीम डेव्हिड - कॅमेरॉन ग्रीन जोडीने चपळाईने दोन धावा काढत मुंबईला विजय मिळवून दिला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने तुफानी खेळी केली. ४५ चेंडूत ६५ धावा कुटत त्याने मुंबईच्या विजयाचा पाया रचला. तिलक वर्मानेही दमदार फलंदाजी केली. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने या दोघांचे तर कौतुक केलेच, पण त्यासोबतच आणखी एका खेळाडूचे कौतुक केले.
मुंबईच्या विजयानंतर सचिनने ट्वीटची सुरूवात 'जिंकलो!' या शब्दाने केली. त्यानंतर त्याने रोहित आणि तिलकचे कौतुक केले. वेगवान गोलंदाजीसमोर आक्रमक फलंदाजी करण्याची मुंबई इंडियन्सची स्ट्रॅटेजी अप्रतिम होती. अशा पिचवर तसेच खेळावे लागते. रोहित शर्माचा फॉर्म परतल्याचे पाहून आनंद झाला आणि त्याने केलेल्या खेळीचे समाधान वाटले. तिलक वर्मादेखील पहिल्या चेंडूपासून खूपच चांगला खेळला, असे सचिनने ट्वीटमध्ये लिहीले. त्यासोबतच, सचिनने अनुभवी पियुष चावलाची स्तुती केली. पियुष चावलाने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने त्याच्याकडे असलेल्या गोलंदाजीच्या प्रतिभेचा योग्य वापर केला आणि गुगली गोलंदाजी करून साऱ्यांनाच प्रभावित केलं, असं म्हणत सचिनने त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली.
दरम्यान, सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या संघाने १७२ धावा केल्या. अक्षर पटेलने अर्धशतक झळकावत संघाला मजबूत धावसंख्या गाठून दिली. त्याने २५ चेंडूत ५४ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने ४७ चेंडूत ५१ धावा केल्या. तर मनीष पांडेने १८ चेंडूत २६ धावा केल्या. पियुष चावलाने ४ षटकांत २२ धावा देत ३ बळी तर जेसन बेहरेंडॉर्फने ४ षटकांत २३ धावांत ३ बळी घेतले. आव्हानाचा पाठलाग करताना, रोहित शर्माने ४५ चेंडूत ६५ धावा, तिलक वर्माने २९ चेंडूत ४१ धावा केल्या. इशान किशननेही २६ चेंडूत ३१ धावा केल्या. अखेर टीम डेव्हिडने एका चेंडूत २ धावा हव्या असताना दुहेरी धाव घेत सामना जिंकला.
Web Title: Mumbai Indians win over Delhi Capitals Sachin Tendulkar praises Rohit Sharma Tilak Verma Piyush Chawla IPL 2023 MI vs DC
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.