मुंबई, आयपीएल 2019 : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 जणांच्या हौतात्म्यानंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तेव्हापासून 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला होता. आज आपला हा महाराष्ट्र दिल्लीचंही तख्त राखतोय, ऐतिहासिक वारसा, संस्कृती-परंपरा जपतोय-जोपासतोय. इंडियन प्रीमिअर लीगमधील मुंबई इंडियन्स संघाने महाराष्ट्र दिनाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी चक्क ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला मराठी शिकवले.आज राज्यात महाराष्ट्र दिन दणक्यात साजरा केला जात आहे आणि आयपीएलमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा एकमेव संघ मुंबई इंडियन्सनेही चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ प्रयत्नशील आहे. 12 सामन्यांत 7 विजय मिळवून 14 गुणांसह मुंबई इंडियन्सचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे त्यांना उर्वरित दोन सामन्यांत एक विजय प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी पुरेसा आहे. गुरुवारी मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादचा सामना करणार आहे. या सामन्यासाठी खेळाडूंनी कसून सराव केला. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात मुंबईचा खेळाडू सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फला मराठी शिकवत आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुंबई इंडियन्सने चाहत्यांना दिलेल्या या शुभेच्छा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
दरम्यान क्रिकेटपटूंनीही महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.