मुंबई : मुंबई इंडियन्सचा संघ चौथ्यांदा इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल) जेतेपदाचा चषक उंचावण्यासाठी सज्ज झाला आहे. तीन वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईनं 2018 मध्ये समाधानकारक कामगिरी केली आणि 2019साठीच्या लिलावात त्यांनी अगदी अखेरच्या क्षणाला युवराज सिंग व लसिथ मलिंगाला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. मलिंगाने यापूर्वीही मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले आहे, परंतु युवराज प्रथमच मुंबईकडून खेळणार आहे. युवराजला मुंबईने ताफ्यात दाखल करून चाहत्यांची मनं जिंकली. युवराजनेही आयपीएलपूर्वीच्या सराव सत्रात सहभाग घेत जोरदार फटकेबाजी केली. मुंबई इंडियन्सनेही खास शैलीत युवराजचे स्वागत केले.
मुंबई इंडियन्ससह त्यांच्या चाहत्यांनाही युवराजकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यामुळे युवराजचे प्रमोशन करण्यात मुंबई इंडियन्स कोणतीच कसर सोडत नाही. त्यांनी युवराजच्या नावानं अनेक जाहीरातीही सुरू केल्या आहेत. मुंबईच्या सराव सत्रात युवीनंही नेट्समध्ये कसून सराव केला. त्याच्या या सरावाचा व्हिडीओ मुंबईने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि तो चांगलाच व्हायरल होत आहे.
''और फिर आए
युवराज सिंग... धागा खोल दिये,'' असे मॅसेज मुंबईनं युवीच्या व्हिडीओखाली पोस्ट केला आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या आत्मचरित्रावर आधारित चित्रपटातील हा प्रसिद्ध डायलॉग आहे. जेव्हा युवी आणि धोनी यांची पहिली भेट होते आणि पंजाबचे प्रतिनिधित्व करणारा युवी माहिच्या झारखंड संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करतो, तेव्हा हा डायलॉय येतो.
पाहा खास व्हिडीओ...
2018च्या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करताना युवीला आठ सामने खेळवण्यात आले. त्यात त्याला 10.83च्या सरासरीनं केवळ 65 धावा करता आल्या. त्यानंतर युवीला राष्ट्रीय संघातूनही बाहेर करण्यात आले आणि किंग्स इलेव्हन पंजाबनेही त्याला करारमुक्त केले. मुंबई इंडियन्सने लिलावात अगदी अखेरच्या टप्प्यात युवीला 1 लाखाच्या मुळ किंमतीत आपल्या चमूत दाखल करून घेतले. युवीनं यापूर्वी आयपीएलमध्ये पंजाबसह दिल्ली डेअरडेव्हिल्स, पुणे वॉरियर्स इंडिया, रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.
Web Title: Mumbai Indians Yuvraj Singh’s batting in nets ahead of IPL 2019, watch video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.