वन डे विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात मोहम्मद शमीने ऐतिहासिक स्पेल टाकून भारतीय संघाला फायनलचे तिकिट मिळवून दिले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिला उपांत्य सामना पार पडला, ज्यात टीम इंडियाने ७० धावांनी मोठा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी सांघिक खेळी करून धावांचा डोंगर उभारला. यामध्ये विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकांचा समावेश होता. पण, धावांचा बचाव करताना सुरूवातीला भारतीय गोलंदाजांना संघर्ष करावा लागला मात्र शमीने सर्वाधिक ७ बळी घेऊन न्यूझीलंडच्या फलंदाजीची कंबर मोडली.
दरम्यान, भारताच्या मोठ्या विजयानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आल्याचे दिसते. चाहते विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांच्या खेळीचा आनंद लुटत आहेत. अशातच दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी देखील या आनंदात सहभाग घेतला. दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून याची सुरूवात केली. मुंबई पोलिसांना टॅग करताना दिल्ली पोलिसांनी लिहले, "मुंबई पोलीस आम्हाला आशा आहे की, न्यूझीलंडविरूद्धच्या हल्ल्यासाठी तुम्ही मोहम्मद शमीवर FIR दाखल करणार नाही." खरं तर सुरूवातीचे दोन बळी घेतल्यानंतर भारतीय संघ एका विकेटच्या शोधात असताना कर्णधार रोहित शर्माने शमीवर विश्वास दाखवला अन् त्याने मिळालेल्या संधीचे सोने केले.
मुंबई पोलिसांनी देखील दिल्ली पोलिसांना त्यांच्याच शैलीत उत्तर दिले. "दिल्ली पोलीस, तुम्ही कित्येक लोकांची मने चोरण्यासाठी कलम लावायला विसरलात आणि सहआरोपींची यादी देखील दिली नाही", असे मुंबई पोलिसांनी म्हटले. त्यानंतर काही वेळातच मुंबईचे विशेष आयुक्त देवेन भारती यांनी देखील यामध्ये उडी घेतली. ते म्हणाले की, दिल्ली पोलीस असे बिल्कुल नाही. ते स्वसंरक्षणाच्या अधिकाराखाली संरक्षणासाठी योग्यच आहे. एकूणच शमीसह भारतीय संघाच्या विजयाचा पोलिसांनीही आनंद लुटला.
भारताची फायनलमध्ये धडक
न्यूझीलंडला पराभूत करून भारतीय संघाने फायनलचे तिकिट मिळवले आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेता संघ १९ तारखेला भारतासोबत अंतिम सामना खेळेल. मोहम्मद शमीने ५७ धावा देत ७ बळी घेतले अन् संघाला विजय मिळवून दिला.
Web Title: Mumbai police and delhi police expressed their happiness on social media after mohammed shami took 7 wickets in IND vs NZ match in icc odi world cup 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.