Ranji Trophy 2024 Final : मुंबईनेरणजी करंडक स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. तामिळनाडू संघावर उपांत्य फेरीत १ डाव व ७० धावांनी विजय मिळवला. ४२ वेळा रणजी करंडक स्पर्धा जिंकणारा मुंबईचा संघ ४८वी फायनल खेळणार आहे. या सामन्यात शार्दूल ठाकूरने दोन डावांता ४ विकेट्स घेतल्या व शतकी खेळी केली. तामिळनाडूच्या पहिल्या डावातील १४६ धावांच्या प्रत्युत्तरात मुंबईने ३७८ धावा केल्या होत्या आणि तामिळनाडूचा दुसरा डाव १६२ धावांवर गुंडाळून मुंबईने फायनलमध्ये प्रवेश केला.
तामिळनाडूचा पहिला डाव ६४.१ षटकांत १४६ धावांवर गडगडला. तामिळनाडूकडून विजय शंकर ( ४४), वॉशिंग्टन सुंदर ( ४३) यांनी खिंड लढवली होती. तुषार देशपांडे ( ३-२४), शार्दूल ( २-४८), मुशीर खान ( २-१८) व तनुष कोटियन ( २-१०) यांनी मुंबईसाठी चांगली गोलंदाजी केली. मुंबईच्या पहिल्या डावात आघाडीचे फलंदाज धडपडले होते. मुशीरने ५५ धावांची खेळी करून डावाला आकार दिला. हार्दिक तामोरने ३५ धावा जोडल्या. शार्दूल व तनुष यांनी १०५ धावा जोडल्या. शार्दूलने १०४ चेंडूंत १३ चौकार व ४ षटकारासह १०९ धावांची खेळी केली. तनुषने १२६ चेंडूंत १२ चौकारांसह नाबाद ८९ धावा करून संघाला ३७८ धावांपर्यंत पोहोचवले.
तामिळनाडूला दुसऱ्या डावातही फार काही करता आले नाही. बाबा इंद्रजितने ७० धावांची खेळी केली. शाम्स मुलानीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. शार्दूल, मोहित अवस्थी व तनुष यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.