मुंबई : सिद्धेश लाड याने विषम परिस्थितीत सुमारे चार तास खेळपट्टीवर ठाण मारले. त्याच्या ७१ धावांच्या खेळीमुळे मुंबईने आपला ऐतिहासिक ५०० वा सामना अनिर्णित सोडवला. मुंबईने या सामन्यात बडोदा संघाविरुद्ध एका गुणाची कमाई केली.
मुंबईला आपला ऐतिहासिक सामना सुरू झाल्यापासून परिस्थिती कठीण होत होती. पहिल्या डावात मुंबईचा संघ फक्त १७१ धावातच तंबूत परतला.त्यानंतर बडोदा संघाने ९ बाद ५७५ धावांवर डाव घोषित केला. त्यामुळे मुंबईला आपला पराभव टाळण्यासाठी खेळपट्टीवर टिकून राहणे गरजेचे होते. सिद्धेष लाडच्या चिवट खेळीने ते शक्य झाले.
सामन्याच्या चौथ्या आणि अखेरच्या दिवशी मुंबईने सकाळी दुसऱ्या डावात चार बाद १०२ वरून पुढे खेळायला सुरुवात केली. मात्र भारतीय संघाचा सलामीवीर अजिंक्य रहाणे (४५) २० व्या षटकांत तंबूत परतला. त्याने स्वप्नील सिंह याने बाद केले. त्यानंतर लाड याने खेळपट्टीवर ठाण मांडले. त्यामुळे ऐतिहासिक सामन्यात मुंबईला पराभूत करण्याचे बडोद्याचे स्वप्न भंगले.
लाड याने सूर्यकुमार यादव (४४) सोबत सहाव्या गड्यासाठी ७९ धावा केल्या. दीपक हुड्डा याने यादवला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर लाड आणि अभिषेक नायर यांनी बचावात्मक भूमिका घेतली. लाड याने आपल्या खेळीत २३८ चेंडूत सात चौकार लगावत ७१ धावा केल्या. तर अभिषेक नायर याने १०८ चेंडूत फक्त आठ धावा केल्या.
आॅफ स्पिनर कार्तिक काकडे याने नायरला बाद करत बडोद्याच्या आशा जागवल्या, मात्र धवल कुलकर्णी याने ३१ चेंडूत दोन धावा करत लाडला साथ दिली. मुंबईने अखेरच्या दिवशी सात बाद २६० धावा केल्या. ग्रुप सीमध्ये मुंबईचा हा तिसरा ड्रॉ आहे. ११ गुणांसह मुंबई तिसऱ्या स्थानावर आहे. बडोदा संघाचे या सामन्यात सात गुण आहेत.संक्षीप्त धावफलक
मुंबई : पहिला डाव १७१ बडोदा ९ बाद ५७५ घोषितदुसरा डाव - मुंबई एकूण ७ बाद २६० पृथ्वी शॉ गो. स्वप्नील सिंह ५६, अजिंक्य रहाणे गो. स्वप्नील सिंह ४५, सूर्यकुमार यादव गो. हु्ड्डा ४४,सिद्धेष लाड नाबाद ७१गोलंदाजी - दीपक हुड्डा १/२०, कार्तिक काकडे २/५०, लुकमान मेरीवाला १/१९, अतीत शेठ १/६६.