मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) ओळख आहे. केवळ खेळाडूच नाही, तर कर्मचाऱ्यांनाही निवृत्तीनंतर बीसीसीआयच्या माध्यमातून मोठे आर्थिक पाठबळ मिळते. मात्र अशी तरतूद स्कोअरर्ससाठी नसल्याने निवृत्त स्कोअरर्सनी आपल्यालाही अर्थिक पाठबळ मिळावे याकरता बीसीसीआयकडे विनंती केली आहे.
गेल्याच मोसमाच्या सुरुवातीला आॅगस्टमध्ये बीसीसीआयने कोणतीही पूर्वसूचना न देता वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या स्कोअरर्सना निवृत्त केल्याची माहिती मिळाली. काही स्कोअरर्सची नियुक्ती विविध स्पर्धांसाठी झालेली असतानाही त्यांना ऐनवेळी माघार घ्यावी लागली. मात्र स्कोअरर्सना आपल्या सेवेतून निवृत्त करताना त्यांच्यासाठी कोणतीही आर्थिक योजना लागू न केल्यानेच सुमारे १७ अधिकृत स्कोअरर्सनी बीसीसीआयला पत्र लिहिले. मात्र अद्याप त्यांना कोणतेही उत्तर मिळालेले नाही.
बीसीसीआयसाठी १९९७ सालापासून स्कोअरिंग करणारे मुंबईचे स्कोअरर विवेक गुप्ते यांनी याबाबत ‘लोकमत’ला सांगितले की, ‘गेल्या मोसमाच्या सुरुवातीलाच ६० वर्षांवरील स्कोअरर्सना बीसीसीआयने निवृत्ती घेण्यास सांगितले. यासाठी आम्हाला कोणतीही पूर्वसूचना मिळाली नव्हती. आम्ही बीसीसीआयला केवळ विनंती करू शकतो. बीसीसीआयकडून निवृत्त झालेल्या खेळाडू, कर्मचारी आणि पंचांसाठी आर्थिक तरतूद केली जाते. आम्हालाही आर्थिक पाठबळ मिळावे, अशी आमची इच्छा आहे.’
वैद्यकीय चाचणी करावी...
६० वर्षांवरील स्कोअरर्ससाठी विशेष वैद्यकीय चाचणी करण्याची मागणी स्कोअरर्सकडून होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेट खेळणाºया कोणत्याही देशात निवृत्तीसाठी स्कोअररला वयाचे बंधन नाही. कामाचे स्वरूप पाहता स्कोअररची फारशी शारीरिक हालचालही नसते. स्कोअरर सावलीत किंवा बºयाचदा वातानुकूलित बॉक्समध्ये बसून काम करतो. त्यांच्यासाठी सतर्कता, एकाग्रता आणि स्पष्ट दृष्टी अत्यंत महत्त्वाची असते. यासाठीच ६० वर्षांवरील स्कोअरर्सची एक वैद्यकीय चाचणी करण्याची मागणी जोर धरत आहे.
बीसीसीआयने १९९७ साली पहिल्यांदा स्कोअररची परीक्षा घेतली होती. त्यानंतर ७ वर्षांनी दुसरी परीक्षा झाली आणि मग हळूहळू सातत्याने परीक्षा होत गेल्या. प्रत्येक राज्य संघटनेकडे ४-५ अधिकृत स्कोअरर्स आहेत.
स्कोअरर्ससाठी एक पॉलिसी बनवण्यात यावी अशी आमची विनंती आहे. वयाची मर्यादा ६५ पर्यंत करण्यास हरकत नाही. जर हे शक्यच नसेल, तर काहीतरी एक आर्थिक पाठबळ स्कोअरर्ससाठी मिळावे. कारण सुमारे २०-२५ वर्षे या सर्वांनी बीसीसीआयसाठी काम केले आहे. अनेक जण नोकरी सांभाळून काम करायचे, तर काहीजण केवळ स्कोअरींगवर अवलंबून होते.
- विवेक गुप्ते, वरिष्ठ स्कोअरर
Web Title: Mumbai scorers write to bcci for financial help
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.