मुंबईने सौराष्ट्रविरुद्ध उभारला धावांचा डोंगर; सर्फराझचे द्विशतक! 

रणजी करंडक क्रिकेट राऊंड अप- ३ बाद २६३ धावांवरुन सुरुवात केलेल्या मुंबईने सामन्यावर भक्कम पकड मिळवली. रहाणेला दुसऱ्या दिवशी आपल्या खेळीत केवळ २१ धावा जोडता आल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 06:26 AM2022-02-19T06:26:14+5:302022-02-19T06:26:30+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai set a mountain of runs against Saurashtra: Sarfaraz's double century! | मुंबईने सौराष्ट्रविरुद्ध उभारला धावांचा डोंगर; सर्फराझचे द्विशतक! 

मुंबईने सौराष्ट्रविरुद्ध उभारला धावांचा डोंगर; सर्फराझचे द्विशतक! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अहमदाबाद : अनुभवी अजिंक्य रहाणेचे शतक आणि सर्फराझ खान याच्या दणकेबाज द्विशतकाच्या जोरावर मुंबईने रणजी स्पर्धेत सौराष्ट्रविरुद्ध आपला पहिला डाव ७ बाद ५४४ धावांवर घोषित केला. यानंतर दुसऱ्या दिवसअखेर सौराष्ट्रने ९ षटकांत बिनबाद १८ धावा अशी सुरुवात केली. 

३ बाद २६३ धावांवरुन सुरुवात केलेल्या मुंबईने सामन्यावर भक्कम पकड मिळवली. रहाणेला दुसऱ्या दिवशी आपल्या खेळीत केवळ २१ धावा जोडता आल्या. त्याने २९० चेंडूंत १७ चौकार व २ षटकारांसह १२९ धावा केल्या. मात्र, सर्फराझने मुंबईला मोठी धावसंख्या उभारुन दिली. त्याने ४०१ चेडूंत ३० चौकार व ७ षटकारांसह २७५ धावा चोपल्या. रहाणे - सर्फराझ यांनी चौथ्या गड्यासाठी केलेली २५२ धावांची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली.  तळाच्या फळीतील तनुष कोटियनने ८१ चेंडूंत ५ चौकारांसह एक षटकार मारत नाबाद ५० धावा काढल्या. चिराग जानी आणि धर्मेंद्रसिंग जडेजा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. यानंतर सौराष्ट्रने सावध सुरुवात करताना दिवसभरात बळी गमावला नाही. 

विदर्भचे जोरदार प्रत्युत्तर

कर्णधार फैज फझलच्या नाबाद शतकाच्या जोरावर विदर्भ संघाने रणजी स्पर्धेत उत्तर प्रदेशविरुद्ध (यूपी) दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात २ बाद २५६ धावांची मजल मारली. उत्तर प्रदेशच्या ३०१ धावांचा पाठलाग करणारा विदर्भ संघ केवळ ४५ धावांनी दूर आहे. डावखुरा गोलंदाज आदित्य सरवटेने ८६ धावात अर्धा संघ बाद करत यूपीला मोठ्या धावसंख्येपासून रोखले. अक्षदीप नाथ (९१), रिंकू सिंग (६५) आणि ध्रुव ज्युरेल (६४) यांनी यूपीकडून दमदार खेळी केली. यानंतर फझल आणि संजय रघुनाथ यांनी २१३ धावांची जबरदस्त सलामी देत विदर्भला अफलातून सुरुवात करून दिली. संजयने १९६ चेंडूंत १४ चौकारांसह ९६ धावा केल्या. विदर्भाला भक्कम स्थितीत आणलेल्या फझलने दिवसअखेरपर्यंत नाबाद राहताना २३६ चेंडूंत २० चौकार व २ षटकारांसह नाबाद १४२ धावा केल्या. अंकित राजपूरने संजयला बाद करून ही जोडी फोडली. यानंतर अथर्व तायडे (५) झटपट बाद झाला.  

शाहचे द्विशतकी पदार्पण

पदार्पणातच विक्रमी द्विशतक ठोकलेल्या सलामीवीर पवन शाहच्या जोरावर महाराष्ट्राने रणजी चषक स्पर्धेत आसामविरुद्ध वर्चस्व मिळवले. पहिल्या डावात ४१५ धावा केल्यानंतर आसामची ३४ षटकांत २ बाद ८१ धावा अशी अवस्था करत महाराष्ट्राने पकड मिळवली. आसाम अजूनही ३३४ धावांनी पिछाडीवर आहे.भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या चिंचवड येथील अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या पवनने दणक्यात प्रथम श्रेणी पदार्पण करताना ४०१ चेंडूंत २० चौकर व २ षटकारांसह २१९ धावांचा तडाखा दिला. दिव्यांग हिंगनेकरने १०४ चेंडूंत ७ चौकारांसह ४६, तर सत्यजीत बचावने १०८ चेंडूंत ६ चौकार व एका षटकारासह ५२ धावांची खेळी करत पवनला चांगली साथ दिली. मुख्तार हुसैनने ८८ धावांत ५ बळी घेत आसामकडून चांगला मारा केला. यानंतर मुकेश चौधरी आणि मनोज इंगळे यांनी प्रत्येकी एक बळी घेत आसामला अडचणीत आणले. 

Web Title: Mumbai set a mountain of runs against Saurashtra: Sarfaraz's double century!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.