मुंबई : पाच वेळा आयपीएल चॅम्पियन राहिलेला मुंबई इंडियन्स यंदा फ्लॉप ठरला. याचे मुख्य कारण दिग्गज खेळाडूंचे अपयश. विंडीजचा अष्टपैलू किरोन पोलार्ड हा त्यातील एक. पोलार्डने ११ सामन्यांत केवळ १४४ धावा केल्या. नंतरच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याने तर नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या नावाखाली पोालार्डला बाकावर बसविले होते.
गुणतालिकेत तळाच्या स्थानावर राहिलेल्या मुंबईबाबत आकाश चोप्राने भाकीत केले की मुंबई यापुढे पोलार्डला रिटेन करण्याच्या विचारात दिसत नाही. त्याला सहा कोटी दिले जातील. याशिवाय मुरुगन अश्विन (१.६ कोटी), जयदेव उनाडकट (१.३ कोटी) आणि टायमल मिल्स (१.५ कोटी) यांनादेखील निरोप देण्याची तयारी सुरू झालेली आहे. मुंबईकडून तिलक वर्मा याने मात्र लक्षवेधी कामगिरी केली. तो संघाची भविष्यकालीन गुंतवणूक असल्याचे आकाशने म्हटले आहे. तिलकने १४ सामन्यांत ३९७ धावा काढल्या. तिलक हा मधल्या फळीतील चांगला फलंदाज असून, त्याचा स्वभावदेखील चांगला आहे. मुंबईने टिम डेव्हिड याच्यावर आधीपासूनच पुरेसा विश्वास टाकायला हवा होता, असे आकाश म्हणाला.