अहमदाबाद : रणजी करंडक सामन्याच्या तिसऱ्या फेरीत मुंबई संघाने एलिट ड गटाच्या सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर ओडिशाविरुद्ध विजयाकडे कूच केली. लाहिली येथे सुरू असलेल्या जी गटाच्या लढतीत विदर्भ संघाने आसामला पराभवाच्या छायेत ढकलले. आज रविवारी चौथ्या आणि अखेरच्या दिवशी विदर्भ संघाला विजयासाठी केवळ ३१ धावाची गरज असून, त्यांचे पाच फलंदाज शिल्लक आहेत. सुलतानपूर येथे याच गटाच्या अन्य एका सामन्यात महाराष्ट्र संघाने उत्तर प्रदेशला लवकर रोखून पहिल्या डावात आघाडी संपादन केली.
फिरकी अष्टपैलू शम्स मुलानीच्या ९९ चेंडूतील ७० धावांमुळे मुंबईने ९ बाद ५३२ वर डाव घोषित केला. नंतर मुलानीच्या तीन बळींमुळे ओडिशाची स्थिती ५ बाद ८४ अशी झाली होती. यामुळे मुंबई संघ बाद फेरी गाठण्याच्या भक्कम स्थितीत पोहोचला आहे. उद्या सामन्याचा अखेरचा दिवस आहे.
विदर्भ संघाविरुद्ध जी गटात आसामने पहिल्या डावात ३१६ धावा उभारल्या होत्या. नंतर विदर्भ संघाला त्यांनी अवघ्या २७१ धावात रोखून आघाडीदेखील संपादन केली. दुसऱ्या डावात मात्र विदर्भाच्या माऱ्यापुढे त्यांच्या फलंदाजांनी गुडघे टेकताच, आसामचा दुसरा डाव केवळ ११० धावात संपुष्टात आला. यामुळे विदर्भाला हा सामना जिंकण्याची संधी आहे. वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानी याने विदर्भ संघाकडून ३३ धावात चार तसेच ललित यादवने २२ धावात पाच गडी बाद केले. याच गटाच्या सुलतानपूर येथे सुरू असलेल्या सामन्यात अनुभवी सत्यजित बच्छावच्या सात बळींमुळे महाराष्ट्र संघाने तिसऱ्या दिवशी उत्तर प्रदेशला ३१७ धावात रोखून आघाडी घेतली आहे.
उत्तर प्रदेशकडून प्रियम गर्गने १५६ धावांचा झंझावात केला, हे विशेष. उत्तर प्रदेशने महाराष्ट्र संघाचे दुसऱ्या डावात ८४ धावात चार गडी बाद केले. महाराष्ट्राची एकूण आघाडी २२९ इतकी झाली आहे. महाराष्ट्र संघाने पहिल्या डावात ४६२ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती.