Join us  

Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ

mumbai vs rest of india : इराणी चषकात मुंबई विरुद्द शेष भारत यांच्यात लढत होत आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 4:58 PM

Open in App

mumbai vs rest of india live score | लखनौ : मुंबईचा संघ अडचणीत असताना कर्णधार अजिंक्य रहाणेच्या संयमी खेळीने त्यांच्या संघाला तारले. श्रेयस अय्यर आणि सर्फराज खान यांनी आपल्या कर्णधाराला चांगली साथ दिली. इराणी चषक २०२४ मध्ये आजपासून मुंबई आणि शेष भारत यांच्यात लढत सुरू झाली आहे. शेष भारतचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ही लढत लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर पार पडत आहे. प्रथम गोलंदाजी करताना शेष भारतने चांगली पकड बनवली. पहिल्या सत्रापासून मुकेश कुमारने मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावण्यास सुरुवात केली. त्याने पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे आणि हार्दिक तमोरे या त्रिकुटाला तंबूत पाठवण्याचे काम केले. मग अय्यर आणि रहाने या जोडीने १०२ धावांची चांगली भागीदारी नोंदवत मुंबईचा डाव सावरला. 

चांगल्या लयनुसार खेळत असलेल्या श्रेयस अय्यरला बाद करण्यात यश दयालला यश आले. अय्यर ८४ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५७ धावा करुन बाद झाला. देवदत्त पडिक्कलने पृथ्वी शॉचा अप्रतिम झेल घेऊन मुंबईला पहिला झटका दिला. त्यानंतर लयमध्ये दिसत असलेला म्हात्रे बाद झाला. तर हार्दिक तमोरेला खातेही उघडता आले नाही. २० षटकांत मुंबईने तीन बाद ६० धावा केल्या होत्या. मग अय्यर, रहाणे आणि सर्फराज खान यांनी अप्रतिम खेळी केली. पहिल्या दिवसअखेर मुंबईने ६८ षटकांत ४ बाद २३७ धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे (८६) आणि सर्फराज खान (५४) धावा करुन खेळपट्टीवर टिकून आहेत. शेष भारतकडून मुकेश कुमारने सर्वाधिक तीन तर यश दयालने एक बळी घेतला. खराब प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ लवकर थांबवावा लागला. 

मुंबईचा संघ -अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, हार्दिक तमोरे, श्रेयस अय्यर, मोहित अवस्थी, शार्दुल ठाकूर, जुनैद खान, सर्फराज खान, शम्स मुलानी, तनुष कोटियन.

शेष भारतचा संघ - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईस्वरन, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, इशान किशन, मानव सुथार, सारंश जैन, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल. 

टॅग्स :अजिंक्य रहाणेमुंबईश्रेयस अय्यर